माझा आदर्श शिक्षक

 'आज करे सो कल, कल करेसो परसो

जलदी क्या है, जब जीना है बरसो'

ह्या तत्वानुसार मी वागत होतो. शारीरिक श्रम म्हणजे ज्यांना बुद्धी  वापरता येत नाहीत अश्या लोकांची आवश्यकता असा सोयीस्कर (गैर)समज मी लहानपणापासून पक्का जपला होता. शिवाय तसेही मी दिवसभर भरपूर खेळ खेळत असायचो, त्यामुळे माझी अंगमेहनत तशीही होतच आहे. वेगळ्या व्यायामाची काय गरज?


मात्र बँकेत नोकरी लागल्यानंतर रोजचा खेळ कधी थांबला हे लक्षातच आले नाही. रोजचा इतर व्यायाम आधीपासूनच नव्हता. मी पदवी मिळवली त्याचदरम्यान जागतिकीकरणाचे परिणामही दिसू लागले होते. मध्यमवर्गाची वाटचाल उच्चमध्यवर्गाकडे सुरू झाली होती. मी ही हळूहळू त्या मार्गाला ओढला जाऊ लागलो. 'लवकर निजे, लवकर उठे त्यास आरोग्यसंपत्ती लाभे' ह्या मंत्राचा त्याग करून मध्यरात्रीपर्यंत जागणे ह्यात भूषण वाटू लागले. काही वर्षातच ' सोफा, कार, मॉल' ह्या संस्कृतीचा कधी भाग झालो हे समजलेच नाही. सोफ्यावर बसून टीव्ही वर जाहिराती बघायच्या, मग कार मध्ये बसून त्या जाहिरातीतील पदार्थ आणायला मॉल मध्ये जायचे हीच ती 'सोफा, कार मॉल संस्कृती '

ह्या सगळ्याचा परिणाम होणे स्वाभाविकच. मात्र त्याच दरम्यान मला एक शिक्षक भेटीस आला. वास्तविक त्याची आमच्या कुटुंबाशी ओळख फार जुनी. मात्र मी त्याच्याकडे इतके वर्ष दुर्लक्ष करत होतो. तो माझ्या आसपास वावरत असला तरी मी त्याच्या अस्तित्वाची दखल घेत नव्हतो. तो मात्र नेटाने माझ्यावर प्रभाव टाकत होता. अखेरीस माझे डोळे उघडण्यास तो यशस्वी झाला. त्याने मला दैनंदिन 'व्यायाम, आहार आणि विहार' ह्या त्रिसूत्री चे महत्व पटवले. ह्या तिन्ही गोष्टी पैकी एकाही गोष्टीपासून फारकत घेऊन चालणार नाही हे ह्या गुरूने समजावले.

मुख्य म्हणजे व्यायाम म्हणजे शारीरिक श्रम नव्हे तर शरीर ताजेतवाने करणे. किंबहुना व्यायाम झाल्यावर तुम्ही दमला असाल तर तो तुमच्यासाठी योग्य व्यायामच नव्हे. व्यायामानंतर तुम्हाला ताजेतवाने वाटले पाहिजे हे त्याने समजावल्यावर व्यायामाबद्दलचा भ्रम दूर झाला. सुदैवाने मला आनंद वाटेल असा व्यायामप्रकारही सापडला. आता मात्र मी कधी सकाळ होतेय आणि व्यायाम 🚴‍♂️ करायला जाता येईल त्याची वाट पाहू लागलो. 


अरे, हो एवढे सांगितलं..पण त्या गुरूचे नाव सांगायचे राहिले... तो गुरू म्हणजे ' मधुमेह '

आता जवळपास एक तप तो मला मार्गदर्शन करत आहे. मी जेव्हा जेव्हा मार्ग भटकतो तेव्हा तो मला पुन्हा जागे करतो आणि सांगतो...

'कल करेसो आज, आज करेसो अब,

पलमे प्रलय हो जायेगा, बहुरी करेगा कब '

Comments

Popular posts from this blog

गाज

मागोवा