गाज

 ' झुक झुक् झुक झुक अगीन गाडी

धुरांच्या रेषा हवेत काढी

पळती झाडे पाहू या

मामाच्या गावाला जाऊ या ....'

लहानपणी मामाच्या गावाला जाण्यासाठी लागणारी प्रवासाची ओढ जी लागते ती वाढतच जाते. माझ्या मामाच्या गावाला जाताना मध्ये लागणारा ' खंडाळ्याचो घाट ' प्रवासाची गंम्मत आणखीच वाढवत असे. अर्थात आपल्याला प्रवासापेक्षा जास्त ओढ लावत असते ते आपण जाणार असतो ते गंतव्यस्थान...destination. खंडाळ्याच्या घाटातील घनदाट झाडी आनंद देत असायचीच मात्र खरी ओढ असायची ती आजोळची! आजोळला जाणे असो की किल्ले बघणे असो... बहुतेकदा मुख्य आकर्षण प्रवास नव्हे तर डेस्टिनेशन हेच असते. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत फिरताना प्रवासापेक्षा तेथील निसर्गच जास्त मोहात पाडत असतो. खर ना!

आजोळी गेल्यावर सुट्टीमध्ये आम्हा भावंडांची मैफल चांगलीच जमायची. त्यांच्याबरोबर केलेल्या छोट्या सहली विसरणे शक्यच नाही. कदाचित त्यामुळेच काही वर्षांपूर्वी त्यांच्याबरोबर प्रवास करत असल्याचे स्वप्न मला पडले. पहाटेच्या झोपेत पाहिलेले हे स्वप्न खूपच आल्हाददायक होते. जागेपणी आपण पाहत असलेल्या स्वप्नाचा आपण ध्यास घेतो तसाच ध्यास मी ह्या झोपेत पाहिलेल्या स्वप्नाचा घेतला होता. मात्र कोणतेही स्वप्न पूर्ण व्ह्यायची असेल तर योग्य वेळ यावी लागते.

दरम्यान मी सायकलच्या चाकांवर उभा भारत फिरलो. केरळमधील निसर्गापासून राजस्थानमधील जंगले, पंजाबमधील लोकांमधील आपलेपणा हे सगळे अनुभवत असताना माझे स्वप्न मात्र माझा पाठलाग करत होतेच. मात्र योग मात्र येत नव्हता. मी कॉलेजमध्ये असताना जागेपणी पाहिलेले मुंबई ते गोवा सायकलप्रवासाचे स्वप्न तब्बल २७-२८ वर्षांनी माझ्या बायकोबरोबर पूर्ण झाले होते. त्यामानाने हे झोपेत पाहिलेले स्वप्न अजून ताजे...जेमतेम ५-७ वर्षांपूर्वीचे होते. हे स्वप्नही प्रवासाचेच होते.

हवाईमार्ग, रस्तामार्ग, रेलमार्ग ह्या तिन्ही मार्गाने प्रवास केला असला तरी ह्या स्वप्नातला प्रवास जरा वेगळा होता. मी तसा ह्या स्वप्नाबाबत अजून फारसा गंभीर नव्हतो. मात्र ह्या वर्षी लग्नाचा रौप्यमहोत्सवी वाढदिवसही हटके साजरा करायचा होता. २५ वर्षांपूर्वी ज्या हॉटेलमध्ये राहिलो होतो तिथेच पुन्हा जायचे, की मुंबईतच हॉटेल ताजमध्ये राहायचे ह्याचा विचार मी करत होतो. मात्र मीराने ह्या दोन्ही गोष्टींना विरोध केला. बरेच दिवस लग्न होऊन इतकी वर्ष झाल्यावरही मी तिला माझा विचार गळी उतरवण्याचा व्यर्थ प्रयत्न करत होतो. तिची नकारघंटा कायम होती. आणि अचानक ....मला माझे स्वप्न आठवले. माझ्या स्वप्नात गंतव्यस्थान नव्हे तर प्रवासच ओढ लावणारा होता.

मी मीराला माझ्या स्वप्नातील प्रवास करण्याविषयी विचारले. तिने क्षणार्धात हो म्हटले. मग सुरू झाला माझा अभ्यास. हो, ते स्वप्न पूर्ण करायचे तर माहिती घेणे आवश्यक ठरणार होते. हा प्रवास ना हवाई मार्गाने होता, ना रेल मार्गाने, ना रस्ता मार्गाने... हम्म, हा होता जलप्रवास! ह्याआधी तास दोन तासांचा जलप्रवास अनेकदा केला असला तरी हा इतक्या कमी अवधीचा प्रवास नव्हता. केरळमधील नदीमध्ये आणि श्रीनगरच्या सरोवरमध्ये हाऊसबोटमध्ये एक दिवस व रात्रही घालवली होती. मात्र ह्या वेळी नदी किंवा सरोवरातही हा प्रवास करायचा नव्हता. माझे स्वप्न होते समुद्रपर्यटनाचे.! माझे स्वप्न होते मोठ्या जहाजामध्ये बसून समुद्रात फिरण्याचे.

समुद्राच्या जवळ राहूनही समुद्रामध्ये दिवसरात्र राहण्याचे माझे स्वप्न अजून अपुरे होते. अखेरीस लग्नाचा रौप्य महोत्सवी वाढदिवस कसा साजरा करायचे ते ठरले... रत्नाकराची गाज मला बोलावत होती...

Comments

Popular posts from this blog

मागोवा