सविनय कायदेभंग
सरळ, संथ प्रवाहादरम्यान एखादा अडथळा यावा आणि त्या प्रवाहाची लय बिघडून जावी, त्याप्रमाणेच गेल्या वर्षी आलेल्या कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग ढवळून निघाले. सामान्य लोक तर सोडाच पण बलाढ्य देशातील मदमस्त सत्ताधीश, हुशारातील हुशार शास्त्रज्ञ गडबडून गेले. जवळपास दीड दोन वर्षानंतरही ह्या महामारीवर कोणताही उपाय सापडला नाही. किंबहुना दोन तीन महिन्यांपूर्वी रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आणि सरकारने पुन्हा एकदा 'कुलुपबंदी'चा फतवा काढला. ह्या फतव्याद्वारे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व बंद राहणार होते. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोहमार्गावरील प्रवास सेवा उपलब्ध होती. मागील वर्षी प्रमाणेच यंदाही बँक सेवा देण्यात येणार होती, मात्र बँक कर्मचाऱ्यांना लोहमार्गसेवा मिळणार नव्हती. बँक व्यवस्थापनाने सर्व कर्मचाऱ्यांना मागील वर्षीप्रमाणेच रोज कामावर येणे बंधनकारक केले होते. घर ते कार्यालय (बँकेची शाखा) हा प्रवास शहरातील शहरात असता तर अगदी चालतही जाता आले असते. मात्र बहुसंख्य बँक कर्मचारी २५ -५० किमी लांबच्या शहरात राहत होते. त्यांनी रोज कामावर यावे अशी अपेक्षा असली, तरी ते कसे या...