सविनय कायदेभंग




सरळ, संथ प्रवाहादरम्यान एखादा अडथळा यावा आणि त्या प्रवाहाची लय बिघडून जावी, त्याप्रमाणेच गेल्या वर्षी आलेल्या कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग ढवळून निघाले. सामान्य लोक तर सोडाच पण बलाढ्य देशातील मदमस्त सत्ताधीश, हुशारातील हुशार शास्त्रज्ञ गडबडून गेले. 

जवळपास दीड दोन वर्षानंतरही ह्या महामारीवर कोणताही उपाय सापडला नाही. किंबहुना दोन तीन महिन्यांपूर्वी रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आणि सरकारने पुन्हा एकदा 'कुलुपबंदी'चा फतवा काढला. ह्या फतव्याद्वारे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व बंद राहणार होते. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोहमार्गावरील प्रवास सेवा उपलब्ध होती. मागील वर्षी प्रमाणेच यंदाही बँक सेवा देण्यात येणार होती, मात्र बँक कर्मचाऱ्यांना लोहमार्गसेवा मिळणार नव्हती.

 बँक व्यवस्थापनाने सर्व कर्मचाऱ्यांना मागील वर्षीप्रमाणेच रोज कामावर येणे बंधनकारक केले होते. घर ते कार्यालय (बँकेची शाखा) हा प्रवास शहरातील शहरात असता तर अगदी चालतही जाता आले असते. मात्र बहुसंख्य बँक कर्मचारी २५ -५० किमी लांबच्या शहरात राहत होते. त्यांनी रोज कामावर यावे अशी अपेक्षा असली, तरी ते कसे यावे याबद्दल ना कोणाकडे उत्तर होते ना फिकीर. राज्य सरकारने तर बँक कर्मचाऱ्यांना लोहमार्ग बंद केला होताच पण  कर्मचाऱ्यांच्या संघटनेने कोर्टात दाद मागितली असता तेथेही नकारघंटाच ऐकावी लागली होती.

राज्य सरकार, कोर्ट कामावर येऊ देण्यासाठी लोहमार्ग उपलब्ध करत नाही, तर बँक व्यवस्थापन कामावर येणे सक्तीचे करत आहे अश्या प्रकारे बँक कर्मचाऱ्यांची स्थिती मात्र 'आई खाऊ घालेना आणि बाप भीक मागू देईना अशी झाली'.

काही कर्मचाऱ्यांकडे लोहमार्ग सेवेचे मासिक / त्रैमासिक तिकीट उपलब्ध होते. मात्र ते तिकीट असूनही, प्रवास करण्यासच मज्जाव होता. तसेच कोणी त्या तिकिटासह प्रवास केलाच तर ५०० रुपये दंड आकाराला जात होता. ज्याच्याकडे तिकीट नसेल त्या बँक कर्मचाऱ्यांकडून हाच दंड १२०० रुपये आकारला जात होता. अस्मादिकांनी मात्र कायदा पाळून सरकारला मान देण्याचे ठरवले होते. अस्मादिक प्रदूषणकारी दुचाकी घेऊन जाऊन येऊन ६५-७० किमी अंतर कापत होते.

वैशाख महिना सरला, जेष्ठ सुरू झाला. तरीही 'कुलुपबंदी' उठण्याचे नाव नव्हते. अधूनमधून वरूण हजेरी लावू लागला. मात्र वरुणास्त्र ठराविक वेळेला येत असल्याचे लक्षात घेत पहिल्या आठवड्यात अस्मादिकांनी ती वेळ सांभाळत घर गाठले. दरम्यान रुग्णसंख्या कमी होत होती. त्यामुळे एखाद्या आठवड्यात लोहमार्ग सेवेचा लाभ घेता येईल असा अंदाज बांधत अस्मादिक रोज दुचाकीवरून कार्यालय गाठत होते....

मात्र अचानक वरुणराजांनी पवित्रा बदलला. आज पहाटेपासूनच त्यांनी संततधार सुरू केली. वर्षाराणी अविरत बरसत होती. अस्मादिकांच्या दुचाकीची चाके लहान होती, त्यामुळे ती घेऊन जाणे म्हणजे अर्धवट कामे झालेल्या रस्त्यातील खड्यांना गळाभेटीचे आमंत्रणच ठरणार होते. 'ओला' चे दर रोज परवडण्यासारखे नव्हते.

आधी कोरोनाच्या विळख्यात एक महिना आणि पुढे कुलुपबंदी मुळे श्विन आणि फुजी अस्मादिकांना कार्यालयात पोचवण्यास तयार नव्हत्याच. 

ह्या परिस्थितीत लोहमार्गप्रवासाशिवाय आज तरी तरणोपाय नव्हता. मात्र सरकारचा कायदा आड येणार होता. अस्मादिकांनी एका मित्राला भ्रमणध्वनी द्वारे बँक कर्मचाऱ्यांना तिकीट मिळण्यास सुरुवात झाली का हे विचारले. त्याने सांगितले की बदलापूरला तिकीट मिळत आहे. हे ऐकताच अस्मादिक खूष झाले. तिकिटांच्या रांगेत उभे राहून अस्मादिक विचार करत होते एक दिवसाचे तिकीट काढावे, एक महिन्याचे की त्रैमासिक तिकीट काढावे. ह्या मनोराज्यात असतानाच अस्मादिक तिकीटखिडकीपाशी पोहोचले. मोठ्या ऐटीत अस्मादिकांनी त्रैमासिक तिकिटांची फर्माईश केली. तर आतील सुंदरीने ,'तुम्हाला प्रवास करण्यास मनाई आहे' असे सुनावले. तरी हिय्या करून आजच्या दिवसाचे तिकीट तरी मिळेल का अशी विचारणा केली. मात्र तरीही नकारच मिळाला.

मग मात्र अस्मादिकांनी (नाईलाजाने) 'सविनय कायदेभंग' करत प्रवास करण्याचा निश्चय केला. आलेली गाडी पकडून अस्मादिक निघाले खरे. 'सविनय कायदेभंग' ठाणे स्थानकात पकडला गेला तर काय करायचे ह्याचा विचार सुरू असतानाच मुंब्रा स्थानक आले. पुढे गाडी रडतखडतच निघाली. इतक्यात समजले की पर्जन्यराजाने घातलेल्या धुमाकुळामुळे लोहमार्गव्यवस्था कोलमडली होती. गाडीने तर आता एकाच जागी ध्यान लावले होते. आता मुंब्रा आणि कळवा दोन्ही स्थानके समान अंतरावर होती. गाडीतून उतरणे शक्य नव्हते. बऱ्याच वेळाने गाडी हलली आणि अश्वशक्ती ऐवजी गर्दभ शक्ती तीही पुढे नव्हे तर गाडीच्या मागे लावल्याच्या अविर्भावात गाडी संथ गतीने काही फर्लांग गेली. मात्र आता खारेगाव फाटक दिसत होते. गाडीने येथेही बराच वेळ ठिय्या दिला. गाडी पुढे सरकण्याचे कोणतेही चिन्ह दिसेना. मग मात्र अस्मादिकांनी गाडीतून बाहेर उडी घेतली. आणि मुंबईत पडलेल्या पहिल्या पावसालाच शरण जात नाईलाजाने 'सविनय कायदेभंग' मागे घेतला.

Comments

  1. खूपच सुंदर शब्दात व्यथा मांडली आहे. सरकार नाही तर निदान कोर्टाने तरी दखल घेतली पाहिजे होती. खूपच वाईट हाल आहेतए. त्यात आता परत आमच्या इथे माझे अकाऊंट असलेल्या बँकेची वेळ वाढवली आहे. 10 ते 4, मध्ये जेवणाची सुट्टी पण नाही. फार वाईट हाल आहेत त्यांचे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गाज

मागोवा