३१ वर्ष
लहानपणापासून तो अबोल होता. प्राथमिक शाळेत कोणी त्रास दिला तरी मारामारी तर लांबच उलटून बोलणंही त्याला जमायचं नाही. मी , संजय आणि योगेश बरोबर तो प्राथमिक शाळेपासून एकत्र.
पुढे माध्यमिक शाळेत मुकुंद मोघेही आमच्यात सामील झाला तेव्हा तोही होताच. आमची शाळा साधी होती. शाळेला स्वतःचे मैदानही नव्हते. मात्र तरीही शाळेने आपल्या परीने आमचे क्रीडानैपुण्य जपण्यासाठी प्रयत्न केले. मुकुंद, योगेश, मी आणि संजय क्रीडा स्पर्धात नित्यनियमाने भाग घ्यायचो. मात्र तो फक्त बघ्याची भूमिका घ्यायचा. शाळेत कलागुणांना मात्र फारसा वाव मिळाला नाही, तरी काही निमित्ताने वक्तृत्व करण्याची संधी मिळायची. तेव्हाही तो कधी पुढे आल्याचे लक्षात नाही.
पुढे कनिष्ठ महाविद्यालयात योगेश आणि मुकुंद आमच्या बरोबर नव्हते. पण माझी आणि संजयची एकाच बेंचवर बसायची परंपरा तिथेही कायम राहिली. तोही आमच्याबरोबर होता.
आमच्याबरोबर त्याचे क्षितिजही थोडे विस्तारले. मात्र त्याचा अबोलपणा, अन्याय सहन करण्याची वृत्ती कायम होती.
कनिष्ठ महाविद्यालय घरापासून लांब असल्याने मला वडिलांनी सायकल घेऊन दिली होती. त्याच्याकडेही सायकल होती.
महाविद्यालयात गेल्यावर आमचे क्षितिज आणखी विस्तारले. तो तेव्हाही आमच्याच परिघात असला तरी विस्तारलेल्या परिघामुळे आमच्यातील अंतर थोडे वाढले होते. अर्थात मनातील अंतर वाढले नव्हते तर आमचा मित्रपरिवार वाढला होता त्यामुळे एकत्र वेळ घालवण्याचा कालावधी कमी झाला होता.
मात्र आम्हा दोघांमध्येही सायकलप्रवासाची आवड हा समान दुवा होता. माझे सायकलप्रेम मर्यादित असले तरी त्याच्या संयमी डोळ्यातील स्वप्न क्षितिजापलीकडील होती.
त्याने माझीही स्वप्न जागवली. आम्ही प्रथम डोंबिवली गणेशपुरी, वज्रेश्वरी सायकलप्रवास करायचे ठरवले. जाऊन येऊन फक्त १०० किमी. तेव्हा ना गुगल मॅप होता , ना मोबाइल. साधा दुरध्वनीही कोणाकडे नव्हता. आम्ही डोंबिवलीच्या बस स्थानकात जाऊन तेथील ड्रायव्हरना गणेशपुरीला जायचा मार्ग विचारून घेतला. जाताना थांबत थांबत अंदाज घेत गेलो. काळ्या घोड्यावरील तो प्रवास वाटला त्यापेक्षा खूपच सोपा वाटला. आमची हिम्मत वाढली. मग आम्ही कर्नाळा गाठायचे ठरवले. हा प्रवास तर आणखी सोपा होता.
ह्या सायकलप्रवासावर मी समाधानी होतो. मात्र त्याचे डोळे त्याला मोठे स्वप्न दाखवत होते. तो म्हणाला,'शशांक, आपण गोव्याला जाऊया'. मी कसे कोण जाणे लगेचच हो म्हटले. पण शंका विचारली की इतक्या लांब कसे जाणार? गणेशपुरी असो की कर्नाळा एका दिवसात परत आलो होतो. गोव्याचे तसे नाही. (पनवेलपुढील कोकण म्हणजे मला रामायणकालीन घनदाट अरण्य असल्यासारखेच वाटायचे.)
त्याच्याकडे उत्तर तयार होते. तो म्हणाला युथ हॉस्टेल अशी सफर आयोजित करते. त्यांचे ऑफिस शोधायला हवे. आंतरजालाची अनुपस्थिती तेव्हा चांगलीच जाणवली. युथ होस्टेलच्या कार्यालयाचा थांग आम्हाला लागला नाही.
आमची पदवी परीक्षा झाली. त्याचवेळी चंद्रशेखर जोशीने १२ वी ची परीक्षा दिली होती. मी आणि शेखरने आणखी एक उपक्रम सुरू केला होता. आम्ही आयुष्यात प्रथमच रेल्वेचा पास काढला आणि नोकरदार वर्गाप्रमाणे रोज छ शि म ट (तेव्हाचे व्ही टी) ला जाऊ लागलो. फोर्टात भटकायला मजा येऊ लागली. पण आमचा उद्देश होता वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थामध्ये जाऊन पुढील अभ्यासक्रमांची चौकशी करण्याचा आणि मुंबई भटकायचा.
दरम्यान 'तो' आई आणि लहान भावाबरोबर गावाला गेला होता. पण बाबा घरी एकटेच आहेत, मी त्यांच्याबरोबर राहतो असे सांगून तो डोंबिवलीला परत आला होता.
संध्याकाळी मात्र आम्ही १०-११ जण रोज कॉफी हाऊसला भेटू लागलो होतो. तेव्हा त्या ११ जणांमध्ये 'तो'ही असायचा. एका संध्याकाळी मी त्याच्या घरी जाऊन त्याला घेऊन कॉफी हाऊसला जायचा विचार केला, पण उशीर होईल म्हणून तो विचार रद्द करून थेट कॉफी हाऊसला गेलो. नितीन पाटीलचेही माझ्याप्रमाणेच झाले. नितीनही मनात विचार येऊनही 'त्या'च्या घरी न जाता नितीन थेट कॉफी हाऊसला आला. आमच्या नेहमीप्रमाणे गप्पा झाल्यावर आम्ही आपापल्या घरी गेलो.
त्याच्या दुसऱ्या दिवशी मी आणि शेखर मुंबईला न जाता आमच्याच (पेंढरकर) महाविद्यालयात गेलो होतो. दोघांनीही आपापले घोडे (सायकली) घेतले. त्यावेळी महाविद्यालयात सायकलींचीच चलती असायची. तेथील काम आटोपून घरी परतत होतो तेव्हा साधारण मध्यान्हीचा सुमार असावा.
माझ्या घराआधीच एका वाड्यात मुकुंद रामनामे राहायचा. सायकलवरूनच रामनामेच्या वाड्यात डोकावले तर त्याच्या घरासमोर काही मित्र जमले होते. मी आणि शेखर घरी जायच्या ऐवजी रामनामेकडे गेलो आणि चौकशी करू लागलो. त्याने काहीही सांगण्यास नकार देत आम्हाला विचारले तुम्ही दोघांनी काही खाल्ले आहे का? इतर मित्रही काही बोलनात. त्यांनी आम्हाला आधी घरी जाऊन खाऊन यायला सांगितले. आम्हीही जिद्दीने तेथेच थांबलो. अखेरीस त्यांनी सांगितले ते निव्वळ अविश्वसनीय होते....
आदल्या रात्री 'त्या'ने घरी विष पिऊन आत्महत्त्या केली होती. ही बातमी सहन करणेच शक्य नव्हते. जो आयुष्यभर स्वतःवरील अन्यायाबाबत हु की चू करण्याची हिंमत करू शकत नाही तो एवढी हिम्मत कसा एकवटू शकला? डोंबिवली गोवा सायकलप्रवास करण्याचा विचार अजून अमलात आणायचा असताना तो इतक्या लांबवरच्या प्रवासाला कसा गेला?
मी आणि/ किंवा नितीन आदल्या संध्याकाळी त्याच्या घरी गेलो असतो तर... हा विचार तर मला अजून छळतो.
काही वर्षांनी मला मधुमेह झाल्यावर माझे लांब पल्याचे सायकलवणे सुरू झाले. मी इंदोर झाशी सायकलप्रवास केला आणि माझ्या डोळ्यात त्याने पाहिलेले स्वप्न तरळले....डोंबिवली गोवा सायकलप्रवास.... ! मात्र नियती ते स्वप्न सहजी पूर्ण करू द्यायला तयार नव्हती. तब्बल पाच वेळा हा प्रवास पुढे ढकलला गेला. एकदा गोवा कन्याकुमारी सायकलप्रवास, तर एकदा नवापूर ते महाबळेश्वर सायकलप्रवास ह्यामुळे डोंबिवली गोवा मागे पडले तर तीन वेळा संपूर्ण नियोजन करूनही पायाला मधुमेहाच्या जखमा झाल्यामुळे ते स्वप्न दूर राहिले. माझ्या मनात आलेही कदाचित तो नसताना माझा हा सायकलप्रवास पूर्ण होऊ नये अशी तर त्याची इच्छा नसेल. पण त्याच क्षणी मनात दुसरा विचार आला ,' छे, उलट तो तर ह्या सायकलप्रवासासाठी मला पूर्ण मदत करेल... आणि त्या वर्षी मात्र मी मीराबरोबर डोंबिवली गोवा सायकलप्रवास पूर्ण केला.
त्यावेळी मी समाधानी होतो ते ह्यासाठी नाही की मी तो प्रवास पूर्ण केला, तर ह्यासाठी की तब्बल २८ वर्षांनंतर मी त्याचे...अविनाशचे स्वप्न पूर्ण केले....
आज त्याच्या ३१ व्या सौर स्मृतीदिनानिमित्त ह्या आठवणी दाटून आल्या. तेव्हाही त्या संध्याकाळी त्याच्या घरी न गेल्याची खंत तर वाटतेच, पण जेव्हा तो भेटेल तेव्हा त्याचे स्वप्न पूर्ण केल्याचे त्याला सांगता येईल ह्याचे समाधानही वाटते.

खूप सुंदर शब्दात मांडलं आहे. एक हुरहूर मात्र कायम राहाते, त्यादिवशी आपण गेलों असतो तर. मी तुमच्या सोबत भूतकाळात गेलो आणि मलाच असे वाटायला लागले की मी तुला सानगतो आहे, चल का आला नाही आपण बघूया. पण नियती पुढे आपण हतबल आहोत ही जाणीव नंतर होते.
ReplyDeleteखरच तेव्हा आपली ओळख हवी होती. कदाचित गोव्याचे त्याचे स्वप्न तेव्हाच पूर्ण झाले असते आणि कदाचित अविनाश आजही आपल्याबरोबर असता
ReplyDelete