खाट क्रमांक ६१३- भाग ४
शालिवाहन शकाचा नववर्षदिन संपल्यावर तिमिराचे राज्य पसरल्यानंतर अस्मादिक स्वगृही परतले. आता माझी खाट क्रमांक ६१३ ही ओळख पुसली गेली होती.
घरी पोहोचताच झालेल्या स्वागतात एकमेकांबद्दलच्या भावना किती उत्कट आहेत ह्याचा प्रत्यय येत होता. खरतर 'ओला'मधून झालेल्या प्रवासानंतरही मला थकवा आला होता. कधी एकदा घरात शिरून आराम करतो असे झाले होते. मात्र मीराने प्रथम मला ओवाळले, पायावर दूध पाणी घातले आणि मगच मला घरात येऊ दिले. हे सगळेच अनपेक्षित पण सुखद होते. हे सगळे चालू असतानाच राहुलचा फोन आला होता.
मीरा आणि राहुलने मला ऍडमिट करताना जी धावपळ केली होती, त्यामुळेच मी आज एकटा घरी परतू शकलो होतो. मात्र तरीही आलेल्या थकव्यावर आराम हेच औषध होते.
मी घरी आल्याचे कळताच अनेकांनी फोन, मेसेज करून चौकशी केली. प्रत्येकालाच काही तरी मदत करावीशी वाटत होते. मात्र घरात आम्ही तिघेही अजून दोन आठवडे home quarantine असल्यामुळे कोणीही प्रत्यक्ष भेटायला येऊ शकणार नव्हते.
खरच, आपल्याला काही मदत करायची असली तरी ती कशी करावी हे बऱ्याच जणांना एरव्हीही सुचत नाही. त्यात हा तीव्र संसर्गजन्य आजार! कोणी मदत देणार तरी कशी आणि कोणी मागणार तरी कशी?
मला तर अगदी मूलभूत मदतीचीच गरज होती. हॉस्पिटलमधून निघताना औषधांची यादी डॉक्टरांनी दिली होती. हॉस्पिटलच्याच औषध दुकानात ती उपलब्ध नव्हती. त्यामुळे सगळ्यात आधी त्याची व्यवस्था करायची होती. डोळ्यासमोर एकच नाव आले... पुष्कर जोशी. त्यानेही ताबडतोब सोय करून दिली.
एक दिवस आराम करण्यात संपला. २१ दिवसीय सायकल मोहिमेचे काम बाकी होते. मी हॉस्पिटलमध्ये असताना सगळ्या सहभागींनी केलेली कामगिरी आता अद्ययावत करायची होती. त्या सगळ्यांना उत्सुकता होतीच. मी यादी अद्ययावत करून पुढील परीक्षणासाठी पाठवली.
इथे रोज सकाळी प्रचंड थकवा जाणवत होता. घरी आल्यावर आता माऊथ ऑर्गन वाजवता येत होता. मात्र घसा, ओठ सारखे कोरडे पडत असल्याने तोही फार वेळ वाजवू शकत नव्हतो. रोजची सकाळ त्रासदायक वाटत होती. त्यामुळे रात्र होऊच नये असे वाटायचे. मात्र निसर्गचक्र सुरूच होते.
आज घरी येऊन आठवडा झाला. अजून एक आठवडा home quarantine राहायचे आहे. अशक्तपणा आठवडाभरापूर्वी होता तसाच आहे. मात्र रोज येणारे मित्रांचे मेसेज, फोन दिवसभरात ताकद देत असतात. ह्या विषाणूशी कसा लढा दिला असे मला विचारले. तेव्हाही मी सांगितले की सकारात्मक दृष्टीकोन हाच एकमेव उपाय ह्यावर आहे. हा विषाणू आधुनिक आहे, त्याच्याकडे तीव्र आणि त्वरित आघात करणारी शस्त्रास्त्रे आहेत. हा गनिमी काव्याने लढतो. हल्ला सुरू केल्यावरदेखील त्याचे अस्तीव लगेच जाणवू न देण्याचे त्याचे कसब वादातीत आहे. एका दिवसात त्याने माझ्या शरीरावर तीव्र हल्ला करून मला जेरीस आणले होते. मात्र तरीही हा विषाणू माझ्यासाठी फार घातक ठरला नाही, कारण मी त्याला ठणकावून सांगत होतो. तुझे वय अजून लहान आहे, माझ्या शरीरातील पेशींना अश्या विषाणूशी लढण्याचा ५० वर्षांहून अधिक अनुभव आहे. तेव्हा विचार कर आणि माझा गड सोड. अर्थात तोही फार चिवट आहे. माझ्याभोवती कडक वेढा घालून तो माझी रसद थांबवू पाहत आहे. मी माझ्या विजयाबद्दल निःशंक आहे. आता फक्त योग्य वेळेची वाट पाहतोय. अजून एक आठवडा.. हा वेढा फोडून अस्मादिक गनिमाला लवकरच पळवून लावतील यात कोणतीही शंका नाही
सुंदर शब्दात लिहिलं आहे
ReplyDeleteधन्यवाद
Deleteसुंदर शब्दात लिहिलं आहे
ReplyDeleteशब्दांकन छान 👍
ReplyDelete