खाट क्रमांक ६१३- भाग ३

'....त्या रात्री बर्फाचे वादळ आले. संपूर्ण गाव बर्फाने वेढले गेले. दुसऱ्या दिवशी मात्र सूर्य तेजाने तळपू लागला आणि आम्ही गाव सोडले. बर्फाच्या वादळाचे कोणतेही चिन्ह उरले नव्हते. रस्ता खराब होता आणि तो लवकरच अधिकाधिक खराब होत गेला. आमची यंत्र (सायकल) ओढत आम्ही मैलोनमैल चालत होतो. आमच्याकडील अन्न संपले होते. सूर्य तेजाने चमकत होता.... खरतर प्रचंड आग ओकत होता. आमच्याकडील पाण्याचा शेवटचा थेंब केव्हाच नाहीसा झाला होता. ह्या सर्व वातावरणात भर म्हणूनच की काय एकाएकी वाऱ्याचे प्रचंड वादळ आले. त्याची तीव्रता इतकी होती की वाळूच्या कणांचे सपकारे तोंडावर येऊन आमचे चेहरे काळे निळे पडले. वाळूचे तडाखे चेहऱ्यावर झेलत, तहान आणि भुकेने व्याकुळ होत आम्ही ८ किमी अंतर चालत गेलो...'

'With Cyclists Around The World' पुस्तकातील उतारा वाचताना माझ्या घशाला कोरड पडत होती. सोमय्या हॉस्पिटलच्या खाट क्रमांक ६१३ वर वातानुकूलित वातावरणात मी घटाघटा पाणी प्यायलो.  अरे, मी सायकल ओढत पर्शिया मध्ये वाळवंटात नाही, तर सोमय्यांच्या हॉस्पिटलमध्ये आहे. हॉस्पिटलमध्ये असल्याची भावना त्या पारशी सायकलपटूंच्या अनुभवापेक्षा सुखद वाटत होती. पुस्तक बाजूला ठेवले. समोर आलेले जेवण जेवून तृप्त मनाने झोपी गेलो.

मी येथे येऊन आता दोन दिवस झाले होते. मी इथल्या वातावरणाला सरावलो होतो. डॉक्टरांनी सांगितले आणखी २ दिवसांनी तुम्ही घरी जाऊ शकता. आता मला घाई नव्हती. मी त्यांच्या स्वाधीन होतो. अशक्तपणा सोडला तर त्रास काहीच नव्हता. दिवसभर वाचन किंवा jio सिनेमा द्वारे चित्रपट पहायचे, राजेश खन्ना- देवानंद, गुलजार ह्यांची गाणी ऐकायची. सरगम कारवा वरील गाणी ऐकायची. जमल्यास फेऱ्या मारायच्या. हॉस्पिटलमध्ये आल्यापासून मी 'आनंद' मधील राजेश खन्ना इथे कसा वागला असता ते डोळ्यासमोर आणत होतो आणि तसा वागायचा प्रयत्न करत होतो. माझ्या शेजारच्या बेडवरील पेशंट चार दिवस oxygen वर होता. त्याला डॉक्टर म्हणालेही,' फक्त सकारात्मक विचार हे तुमचे औषध आहे.' माझ्याकडे अंगुलीनिर्देश करत ते म्हणाले, 'ह्यांच्याप्रमाणे राहा, तुम्ही लवकर बरे व्हाल'. मी त्या पेशंटशी सायकलबद्दल बोललो, तेव्हा तोही खुशीत येऊन म्हणाला ,'अहो मी पण रोज १० किमी चालतो'. मग मी म्हटले, मग तर तुमची oxygen ची पातळी निश्चित चांगली असणार, काळजी करू नका'.

दुसऱ्या दिवशी तो पेशंट उठला तोच सकारात्मकतेने. त्याची बाहेरून oxygen घेण्याची गरजच संपली होती.  त्याने ते नळकांडे बाजूला केले. ज्याची oxygen पातळी गेले चार दिवस ९४ वर येत नव्हती तो आज oxygen च्या नळकांड्याशिवाय ९६ वर पोचला होता.

आमच्याकडून शारीरिक व्यायाम करवून घ्यायला एक ट्रेनरही होता. मी त्यांना विचारले मी रोज ५०-६० किमी सायकल चालवायचो, तर मी रोज ३० मिनिटे चाललो तर हरकत नाही ना! त्या ट्रेनरने मला जमिनीवर उतरवले,' तुमच्याकडून १० मिनिटं व्यायाम करून घेतला तर तुमचा oxygen दोन अंकांनी कमी होतोय. तुम्ही एका वेळी जास्तीत जास्त १० मिनिटं चाला. दिवसभरात असे तीन वेळा चाललात तरी अर्धा तास होईल.' माझे विमान जमिनीवर उतरले. कॉन्फिडन्स असणे चांगले, पण ओव्हरकॉन्फिडन्स नको.

पुढचे दोन दिवस संपले. डॉक्टर काही सोडण्याचे नाव घेईना. मीही शांत होतो. सोमवारी डॉक्टरांनी पुन्हा पुढची तारीख दिली... तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. दुसरा दिवस गुढीपाडवा होता. चला, किमान गुढीपाडव्याला तरी घरी जाईन. मंगळवारी सकाळी नर्सने मला सांगितले की आज मला डिस्चार्ज मिळेल. Mediclaim च्या procedure मुळे थोडा वेळ लागेल. म्हटलं हरकत नाही. तासाभराने नर्सने सांगितले बहुतेक उद्याच डिस्चार्ज मिळेल. थोड्या वेळात सांगते. पुढच्या दोन तीन तासात काहीच कळले नाही. मी मनाची तयारी केली की अजून एक दिवस राहावे लागणार. मात्र ३.३० पासून इन्शुरन्स कंपनीचे संदेश यायला लागले की तुमचा क्लेम आलाय, scrutiny सुरू आहे, क्लेम सेटल केलाय, हॉस्पिटलला संपर्क करा.

मी अर्धा तास वाट पाहून reception ला गेलो, त्यांना संदेश दाखवला,' ते म्हणाले खालून आम्हाला निरोप येईल, तेव्हा बघू, पुन्हा पुढचा तास-  दीड तास काहीच कळेना. मध्यंतरी चहा नाष्टा आला. मी आजची रात्र इथेच काढायची ह्या तयारीत होतो. पुन्हा चित्रपट पाहायला लागलो.. 'बाल शिवाजी'. मेघेशने मी हॉस्पिटलमध्ये असताना छान छान जुन्या मराठी चित्रपटांची लिंक पाठवली होती. 'छत्रपती शिवाजी' कालच पाहून झाला होता. आज 'बाल शिवाजी' त्याचे सवंगडी जमवत असताना नर्सने अडथळा आणला..  म्हणाली,'तुम्हाला आत्ता डिस्चार्ज मिळतोय.' मी खात्री करण्यासाठी विचारले,'कपडे बदलू?' तिने 'होय' म्हणून सांगितले. थोड्या वेळात घरी गेल्यावर कोणती औषधे घ्यायची, किती दिवस घ्यायची ह्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

मी भराभर पिशवी भरली. उरलेली औषधे भरली, हेडफोन पिशवीत भरला. आणि वाट पाहत बसलो. थोड्या वेळाने wheel chair आली. मला त्यात बसायला सांगितले. मला उत्साह आला होता. मी म्हटले ,'अहो wheel chair कशाला? मी चालतच जातो.' पण मी अजूनही त्यांच्याच ताब्यात होतो. कडेकोट बंदोबस्तात पहारेकऱ्यांच्या चौकशीला सामोरे गेल्यावरच त्या वॉर्डबॉयच्या wheel chair मध्ये बसल्यामुळेच मला त्या मजल्यावरच्या लिफ्टमध्ये जाता आले. शिवाजीमहाराजांच्या किल्ल्यावरील बंदोबस्त किती चोख असेल ह्याची कल्पना ह्या हॉस्पिटलमध्ये असलेल्या बंदोबस्तावरून येत होती. अमोल कोल्हे ह्यांच्या 'स्वराज जननी जिजामाता' मालिकेतील शिवाजीमहाराज पन्हाळ्यावर सिद्धीच्या वेढ्यात अडकले असताना अस्मादिक मात्र सोमय्यांच्या किल्ल्यातून सुखरूप बाहेर पडत होते. 

खाली गेल्यावर मी तडक ओला ला पाचारण केले. OTP सांगताच माझा ओला रथ डोंबिवली परगण्याच्या दिशेने वेगात दौडत निघाला...

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गाज

मागोवा