खाट क्रमांक ६१३ - भाग २
प्रशस्त वातानुकूलित खोली.….. खोलीमध्ये दोन खाट होत्या. एका खाटेवर एक इसम ऑक्सिजनच्या नळकांडयांच्या भेंडोळ्यात पहुडला होता. शेजारची खाट ही माझी आता ओळख होती... खाट क्रमांक ६१३. मी पटकन आकडेमोड केली... ६+३ म्हणजे ९. ९ चा अंकांच्या बेरजेवर काहीच परिणाम होत नाही. म्हणजे माझ्या खाटेच्या क्रमांकाची बेरीज १ येत होती. चला १ ही माझी मित्र संख्या होती.
मला येथील कपडे अंगावर चढवावे लागले. थोड्या वेळात जेवण आले. भूक लागली होतीच. खरोखरच अप्रतिम जेवण होते. बसून बसून करणार काय? झालो आडवा. ४ वाजता चहा आला. मात्र बरोबर आलेली बिस्किटे म्हणजे नुसता पुठ्ठा.. ना चव ना ढव.. निव्वळ आजाऱ्यांसाठी बनवतात ती मारी बिस्किटं होती ती. शशांक, तू सुद्धा 'आजारी' आहेस म्हणून इथे भरती झाला आहेस. खा आता मारी!
माझ्या पिशवीत मी माझी आवडती nutrichoice आणली होतीच. ती पुरवून खावी लागणार होती. तास दीड तासाने पुन्हा भूक लागली. मी गपचूप खोलीबाहेर आलो आणि reception वर चहा मागवायला सांगितले. थोड्या वेळात चहा येताच आधी दोन nutrichoice खाल्ली. तेवढ्यात फळांची छोटी डिश आली. संध्याकाळी फळ? हे तर सर्दी खोकल्याला निमंत्रण! रुग्ण लवकर बरा होऊ नये ह्यासाठी तर हे प्रयत्न नाही ना? असो, आधी जठराग्नीला आहुती देऊ या.
रात्री जेवणानंतर दूधही आले. अजून काय पाहिजे? पहिला दिवसतर मस्त गेला.
दुसऱ्या दिवशी नाश्त्याच्या वेळी एक नर्स मला इन्सुलिन द्यायला आली. मी चक्रावलो, दुसऱ्या कोणाच्या ऐवजी मला तर इन्सुलिन देत नाही ना? मी त्यांना सांगितले,' मी अजून कधीही इन्सुलिन घेतलेले नाही, तुम्ही मला का इन्सुलिन देत आहात ?'. त्यावर मी चौकशी करते असे पुटपुटत ती निघून गेली. नंतर जेवणाच्या वेळी एक डॉक्टर आली. तिने समजावले आम्ही तुम्हाला स्टिरॉइड देत आहोत, त्यासाठी इन्सुलिन द्यावे लागते. मी म्हणालो ठीक आहे पण तशी कल्पना तर द्या.
मग आयुष्यातील पहिले इन्सुलिन टोचून घेतले. शुगर ने २५० ची पातळी गाठली होती. आता निमूटपणे इन्सुलिन टोचून घेणे भागच होते. थोडा वेळ 'With Cyclists Around The World' वाचले. शरीर बेडवर होते, पण मन त्या सायकलपटूंबरोबर जगभर भटकायला निघाले होते.
जसजसा वाचत गेलो तेव्हा माझ्या सायकल सफरी किती सुरक्षित, सहज होत्या हे जाणवत होते. दिवसरात्र सायकल ढकलत न्यायची, त्यात लूटमार करणाऱ्यांकडून झालेली लूट, वाळवंटातील अतिउष्ण आणि अति थंड हवामानात तुटपुंज्या साधनांसह सामना...अबब ह्यांच्या अडचणीचे डोंगर संपतच नव्हते. मी त्यांच्या बरोबर नव्हतो हे माझे किती सद्भाग्य असे वाटू लागले. वाचता वाचता अरेबियन नाईट मधील सुरस कथांचाच भास होत होता. नकळत त्यांच्या धाडसाला हात जोडले जात होते. मात्र १०० वर्षांपूर्वीची इंग्रजी भाषा समजायला वेळ लागत असल्याने की आजारपणामुळे... थोडी पाने वाचली की झोप येत होती. असे वाटत होते की हा खजिना मराठी वाचकांना उघड झाला पाहिजे. माझ्या परीने मी अनुवाद करायलाही सुरुवात केली. मात्र अनुवाद करत बसलो तर वाचनाचा वेग आणखी मंदावू लागला. मग तो नाद सोडून दिला. म्हटलं आधी खाटेवर बसल्या जागी ह्या सायकलपटूंबरोबर जगप्रवास तर पूर्ण करू....

Comments
Post a Comment