दोस्त असावा तर असा
दोस्त असावा तर असा...

दोस्ती म्हणजे मैत्री ही खरोखरच ईश्वराची देणगी म्हणायला हवी. ती मागून मिळत नाही आणि बाजारात विकतही मिळत नाही. आपली मैत्री जुळायला मनाचे बंध जुळावे लागतात. मात्र केवळ मन सांभाळणाऱ्याला मित्र म्हणता येईल का? तो तर खूषमस्कऱ्या झाला. मित्र असा पाहिजे जो आपल्या पाठीशी घट्ट उभाही राहील आणि आपला पाय घसरत असेल, आपण चुकत असू तर आपल्याला योग्य वाटेवरही आणेल.
लहानपणी दिवसभर मैदानी खेळ खेळण्यात आपली ऊर्जा खर्च होत असते. मात्र विशी-पंचविशीनंतर आपले बैठे खेळच अधिक सुरू होतात... त्यात कार्यालयीन कामकाजही आलेच. हळूहळू आपण जगणेच विसरून जातो, आलेला दिवस ढकलणे इतकं ओझं वाहण्यात जीव गुदमरतो. काहीजण तर हसणंही विसरून जातात. आश्चर्य म्हणजे आपण काय काय विसरलोय हेच आपण विसरतो.
अश्या वेळी खरा मित्रच आपल्याला सावरतो. असेच काहीसं माझ्या बाबतीत झालं होतं. घर-ऑफिस-घर यात गुरफटून गेल्यावर माझ्यापुरता मी शिल्लकच राहत नव्हतो. खरं तर माझे शाळा कॉलेजमधील अनेक मित्र माझ्या बरोबर होते, बँकेतही अनेक घनिष्ठ मित्र मिळाले होतेच. त्यामुळे तसा मी आनंदी होतोच. मात्र एका मित्राची मी आतुरतेने वाट पाहत होतो. तो कधीना कधी मला भेटणार ह्याची मला खात्रीच होती. इतर कोणत्याही मित्रापेक्षा त्याची मैत्री अधिक घट्ट असणार ह्याचीही मला खात्री होती.
आणि, अखेरीस तो मला भेटलाच. आमची ओळख होताच माझ्या कयासाप्रमाणेच आमची लगेचच घट्ट मैत्री झाली. तसे आमचे ऋणानुबंधच घट्ट होते. पिढ्यांपिढ्यांची आमचे संबंध होते. पण त्याच्याशी माझ्या मैत्रीवर शिक्कामोर्तब होईपर्यंत माझ्या वयाची ३८ वर्ष निघून गेली होती. आज आमच्या मैत्रीच्या शिक्कामोर्तबावर, हवं तर रजिस्ट्रेशनवर म्हणा, तब्बल एक तप पूर्ण झाले.
१२ वर्षांचा हा काळ कसा निघून गेला ते कळलेही नाही. ह्याच्याशी माझी मैत्री झाल्यावर जणू माझे बालपणच परत मिळाले. 'बालपणीचा काळ सुखाचा' किंवा 'लहानपण देगा देवा' असे नुसते म्हणून ते बालपण परत येत नसते. मात्र ह्या मित्राची गाठ पडल्यावर मात्र माझे बालपण मला खरोखरच परत मिळाले.
सर्वप्रथम ह्याच्यामुळे मी रोज सकाळी नदीकिनारी बागेत फेरफटका मारायला जायला लागलो. ताजी हवा, त्याचा वास, सुगंध... असा असतो हे तेव्हा कळलं. हळूहळू त्या फेरफटक्याची इतकी सवय लागली की बागेतील झाडेही जणू माझी वाट पाहू लागली होती. इतक्यात ह्याने मला आठवण करून दिली ती अश्या गोष्टीची ज्यासाठी मी लहानपणी तहानभूक विसरत असे... ती म्हणजे सायकलवणे. तसा मी सायकलवायला बऱ्याच उशिरा म्हणजे कॉलेजमध्ये असताना सुरुवात केली होती. पण ह्याने आठवण करून देताच कॉलेजच्या अगोदर जेवढे दिवस सायकलवायला मिळाले नव्हते ती सगळी कसर भरून काढली गेली. आता मी नुसता चालण्यापेक्षा सायकलवरून आसपासचा निसर्ग ही हिंदडू लागलो. सायकलमुळे तर जगभरातील मित्र मिळाले.
पण केवळ लहानपणीचे दिवस परत आणून देण्यात, मला निसर्गात भटकायचं वेड लावण्यात माझ्या मित्राचे मन भरेना. त्याने माझ्या रसनेचीही कक्षा रुंदावली. केवळ गोड आणि तिखट ह्या दोनच चवी माहीत असलेल्या मला पुन्हा एकदा तुरट, आंबट, कडू ह्या चवी माझ्या मित्राने माहीत करून दिल्या,.... नव्हे ह्या चवींशी माझी पुन्हा मैत्री झाली. माझे लहानपण मी पुन्हा पुरेपूर उपभोगू लागलो. खरं सांगायचं तर माझ जीवनच मी नव्याने जगू लागलो होतो.
ह्या सगळ्याला कारणीभूत असलेल्या ह्या मित्राची मैत्री तशी साधी नाही बरं का! हा अधूनमधून आपली परीक्षाही घेत असतो. जरा कुठे मी सायकलवायला कंटाळा केला, निसर्गात भटकणे कमी केले, किंवा वेगवेगळ्या चवी चाखणे कमी केले की हा लगेच गुरगुरायला तयार. ह्याची मैत्री जेवढी घट्ट तसाच ह्याचा दराराही फार. काय बिशाद आहे ह्याने डोळे वटारले की नाही म्हणण्याची! मात्र ह्याची मैत्री अशी की बाकी मित्र मध्ये सोडून जातील, पण हा शेवटच्या श्वासालाही हजर असेल.
आज ह्याच्या मैत्रीचे तप म्हणजे बारा वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्ताने आम्ही आमच्या मैत्रीचा हा वाढदिवस पावभाजी आणि सीताफळ बासुंदी पिऊन साजरा केला... अरे हो, माझ्या ह्या मित्राचे नाव तुम्हाला सांगितलेच नाही की... ह्याचे नावही फार 'मधू'र आहे....' मधुमेह'!
Comments
Post a Comment