कर्नल
कर्नल... दिलीपचे टोपणनाव! तसा दिलीप काही माझा विशेष आवडता खेळाडू नव्हे, किंबहुना अंमळ नावडताच! त्याची खेळी पाहून त्याला पडलेले 'दिलीप पॅडपुढेकर' हे नाव सार्थ करणाराच त्याचा खेळ वाटायचा. खरेतर त्या खेळामुळेच तर हे नामाभिमान त्याला मिळालं होतं. मुंबईच्या क्रिकेटच्या मातीतील खडूसपणा मात्र त्याच्यात पुरेपूर मुरलेला होता. लॉर्ड्स ह्या क्रिकेट पंढरीमध्ये तीन कसोटी शतके काढणारा तो पहिला (कदाचित अजूनही एकमेव) परदेशी फलंदाज म्हणूनच तो 'लॉर्ड ऑफ लॉर्ड्स' ठरला होता!
१९८७ च्या वर्ल्ड कप नंतरची पहिलीच कसोटी मालिका होती. सनी नुकताच निवृत्त झाला होता. कर्नलच्या गळ्यात कर्णधारपणाची माळ पडली होती. वेस्ट इंडिजने दिल्लीवर झेंडा फडकवल्यामुळे मालिकेतील मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरील सामन्याबद्दलची उत्सुकता फारच वाढली होती. सामना मुंबईत, त्यातून भारताने जिंकणे आवश्यक झालेले. सामना रंगतदार होणार यात काही शंकाच नव्हती.
मात्र भर मार्गशीर्ष महिना असूनही दीड दिवस पर्जन्यराजाने गाजवला होता. शेवटचा दिवस बाकी होता तेव्हा वेस्ट इंडिजची पहिल्या डावातीलही शेवटची विकेट बाकी होती. सामना अनिर्णितावस्थेत संपणार हे जवळपास नक्की झालं होतं. मात्र तरीही माझ्या आग्रहाखातर उदय आणि चारू शेवटच्या दिवशी माझ्याबरोबर सामना पाहायला आले होते. चिवट फलंदाजी करणाऱ्या बट्टला बाद करून शास्त्रीने वेस्ट इंडिजचा डाव गुंडाळला. भारताची फलंदाजी पाहायला मिळण्याचे अमिष दाखवून आलेले चारू आणि उदय खूष झाले. श्रीकांतने पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावातही पुन्हा मैदान गाजवले खरे, मात्र दिलीप वगळता इतर सहा जणांनी मिळून फक्त २४ धावा काढल्या होत्या. दुसऱ्या डावात भारताचे ७ गडी बाद झाले तेव्हा भारताकडे जेमतेम ७६ धावांची आघाडी होती. उदय, चारुच काय स्टेडियममधील सगळ्यांच्याच तोंडचे पाणी पळाले होते. खरतर वेस्ट इंडिजचा विजय आता केवळ औपचारिकता उरली असे वाटू लागले होते. मात्र कर्नल खंबीरपणे उभा होता. त्याच्या जोडीला आला होता नवोदित फिरकीपटू अर्षद आयुब. प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरील चिंतेचे सावट दिलीपवर दिसत नव्हते. बाजीप्रभूप्रमाणे तो खिंड लढवत होता. जवळपास दोन सेशन बाकी होते. दिलीप चेंडुमागून चेंडू खडुसपणे खेळून काढत होता. वॉल्श, पॅटरसन आग ओकत होते, मात्र दिलीपने डोक्यावर बर्फ ठेवला होता. दिलीपचा खडूसपणा अर्षद अयुबसुद्धा दाखवू लागला. वेस्ट इंडिजचे गोलंदाज एकामागून एक अस्त्र सोडत असताना अर्षदला बरोबर घेत दिलीप त्या अस्त्रांना निष्प्रभ करत होता. साधारण लंचपासून जमलेली ही आठवी जोडी टि टाइम झाला तरी फुटता फुटत नव्हती. अखेरीस अयुबचा भक्कम बचाव तर वॉल्शने भेदलाच, पण नंतर आलेल्या चेतन आणि मनिंदरला भोपळाही न फोडता परत पाठवले. मात्र एव्हाना फक्त मेंडेटरी ओव्हर्सचा खेळ उरला होता आणि अयुबला हाताशी धरून कर्नलने भारताची आघाडी वाढवली होती ११७ धावांपर्यंत आणि अख्खा एक सेशनही ह्या जोडीने खर्ची पाडला होता. कर्नल अखेरीस नाबाद राहिला होता. ग्रीनिज, हेन्स धडाकेबाज खेळ करून दाखवण्याच्या इराद्याने उर्वरित वेळात सामना जिंकण्यासाठी उतरले खरे. पण, कपिल, चेतनने टाकलेल्या दोन षटकात ग्रीनिजला गमावून केवळ ४ धावा करता आल्यावर वेस्ट इंडिजने तह मान्य केला. कर्नलने विंडीजच्या हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावून घेतला होता. अनिर्णित सामन्यात किती रंगत, नाट्यमयता असते त्याचे हे उत्तम उदाहरण होते. दिलीपच्या खडुसपणामुळे वेस्ट इंडिजच्या गोलंदाजीचा नक्षा मात्र उतरला होता.
हया गोष्टीला साडेतीन वर्षे लोटली होती. मी शेअरमार्केटसमोरील इमारतीमध्ये काम करत होतो. वैशाख महिन्याच्या रणरणत्या उन्हात मुंबई विरुद्ध हरियाणा यांच्यातील रणजी चषकाची अंतिम फेरी सुरू होती. मुंबईचा कर्णधार होता कर्नल दिलीप वेंगसरकर.
तेच वानखेडे मैदान... तोच कर्नल... तेच कपिल आणि चेतन शर्मा. मात्र आता कपिल आणि चेतन कर्नलच्या विरोधात आग ओकत होते. हरियाणाने पहिल्या डावात आघाडी मिळवल्यामुळे सामना अनिर्णितावस्थेत संपला असता, तर हरियाणाला पहिल्या डावाच्या आघाडीवर चषक मिळणार होताच. मुंबईकडे मात्र सामना जिंकणे हाच पर्याय चषक मिळवण्यास शिल्लक होता.
शेवटच्या दिवशी हरियाणाचे उरलेले दोन बळी झटकन गुंडाळून मुंबईने सामना जिंकण्यासाठी कंबर कसली. लक्ष्य होते ३५५ धावांचे. शेवटच्या दिवशी ते निश्चितच सोपे नव्हते. वेळही जेमतेम होता. धडाकेबाज खेळाचीच गरज होती. मी ऑफिसमध्ये असलो तरी माझे लक्ष मात्र मुलुंडला दूरदर्शनवर सामना बघत मला अपडेट करत राहणाऱ्या धिरजच्या फोनकडेच होते. धिरज स्वतः टाइम्स शिल्डमध्ये खेळायचा. बराच वेळाने त्याचा फोन आला. टी टाइम उलटून गेला होता. त्याने अधिरपणे सांगितले, 'शशांक जिंकायला ९० धावा हव्यात आणि अजून ५ विकेट बाकी आहेत.' मी ताबडतोब निघालो. अक्षरशः धावत धावत नॉर्थ स्टँडच्या तिकीट खिडकीपाशी पोचलो. तिथे समजले आणखी दोन गडी बाद झालेत. शेवटच्या तीन विकेट हातात आहेत. कर्नल मात्र मैदानात होता.
तिकीट घेऊन मी पुन्हा धावतच नॉर्थ स्टँडमध्ये विसावलो. तोपर्यंत आणखी दोन गडी बाद झाले होते. जिंकायला ५० धावांची गरज मैदानात शेवटचा गडी ऍबे कुरुविलाला घेऊन कर्नलला लढाई जिंकायची होती. म्हणजे षटकातील पाच चेंडूत धावा काढून परत शेवटच्या चेंडूवर एक धाव काढून पुन्हा स्ट्राइक ठेवला तरच सामना जिंकण्याची शक्यता होती. त्यातच कर्नल जायबंदी झाला. तो एका पायावर उभा राहून खेळायला लागला. त्याच्या बदली धावण्यासाठी अतिरिक्त खेळाडू मैदानात आला होता. अंगावर येणाऱ्या तोफगोळ्यांना कर्नलने त्वेषाने मैदानाबाहेर भिरकवायला सुरुवात केली. 'पॅडपुढेकर'ने आता नरसिंहावतार धारण केला होता. नॉर्थ स्टँड मध्ये तब्बल ५ षटकारांची माळ दिलीपने वाहिली. त्यातील दोन फुले माझ्यासमोरच पडली. एका पायावर उभा राहून कर्नल आता कपिल- चेतन शर्माची गोलंदाजी फोडून काढत होता. कुरुविला मैदानात आला तेव्हा जिंकायला ५० धावांची गरज असताना आता लक्ष्य जेमतेम पाहता पाहता ३ धावांवर आले होते. ४७ धावांच्या भागीदारीत कुरुविलाच्या नावावर फक्त ५ धावा होत्या. अवघ्या ६५ षटकात मुंबईने ३५२ धावा कुटून काढल्या होत्या. कर्नल १३९ धावांवर खेळत होता.
शेवटून दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू, स्ट्राइकवर कुरुविला होता. हा चेंडू त्याने खेळून काढला की शेवटच्या षटकात स्ट्राइकवर कर्नल येणार होता. जिंकण्यासाठी आवश्यक ३ धावा दिलीप चौकाराने पूर्ण करणार की षटकाराने एवढीच उत्सुकता होती. नॉर्थ स्टँड मध्ये सहावा षटकार येऊन मुंबई चषक जिंकणार का ही उत्सुकता होती. कुरुविलाची बॅट चेंडूला लागली, चेंडूने सेफ लँडिंगही केलं होतं. मात्र.......
कुरुविला एकटाच धाव घेण्यासाठी धावला... कशासाठी ... उरलेल्या दोन धावा स्ट्राइकवर येऊन कुरुविला मारणार होता का? दिलीपला फलंदाजी येत नाही अशी शंका त्याला आली होती का?...
दिलीप आणि त्याचा रनर हताशपणे पहात होते... कुरुविलाने धावबाद होत विकेट फेकली होती...
मुंबईचा रणजी चषक कुरुविलाच्या मुर्खपणामुळे दिलीपच्या डोळ्यादेखत दोन धावांनी निसटला होता. दिलीप आजही नाबाद होता.
कर्नलचे कौतुक करण्यासाठी मी मैदानात शिरलो. कर्नल समोर होता...दोन फुटांवरून मी पाहत होतो... पण त्याच्याजवळ जायची हिम्मत होत नव्हती.. दिलीप ढसाढसा रडत होता. दिलीपचे हे रूप खूपच वेगळे होते..
आता त्याला मी 'पॅडपुढेकर' म्हणू शकणार नव्हतो, आज तो त्याच्या 'कर्नल'पणाला जागला होता.... वानखेडेवरच मी त्याची सामना वाचवतानाची बर्फासारखी थंड खेळी पाहिली होती आणि आज त्याचा रुद्रावतारही पाहिला होता. सामना हरियाणाने जिंकला होता, पण प्रेक्षकांची मने मात्र दिलीपने जिंकली होती.
Dada... Khupch chan shabdankan.
ReplyDeleteधन्यवाद
DeleteDada... Khupch chan shabdankan.
ReplyDeleteधन्यवाद
DeleteDada... Khupch chan shabdankan.
ReplyDelete