बॉबी

 'लाली, शांत बस बघू. माझ्या आणि बॉबीच्या मध्ये येऊ नकोस'. मला लालीपेक्षा बॉबीच जास्त आवडायची. बॉबी होतीच तशी. सुंदर, गोड, लाघवी! लाली तशी वाईट नव्हती पण.... लाली आमच्या घराभोवती फेऱ्या मारत माझे लक्ष जातेय का हे पाहात असायची. मात्र मी बॉबीबरोबर असल्याचे पाहून मात्र ती गप्प राहायची. बॉबी तिचंच पिल्लू होत.... पांढरशुभ्र!

हळूहळू बॉबी मोठी होत होती, तशी लालीही तिला एकटं सोडू लागली. लाली आता आमच्या घरापासून लांब भटकायला लागली पण बॉबी मात्र आमच्या घरापाशीच राहत होती. बॉबीबरोबर खेळता खेळता मी खुष असायचो. मात्र मला एक आश्चर्य वाटायच की मी दोन पायांवर चालायचो, तशी लाली आणि बॉबी का चालत नाहीत? मग मी बॉबीचे पुढचे पाय धरायचो आणि तिला बजावायचो, ' बॉबी, आता दोन पायावरच चालायचं बर का माझ्यासारख.' ती पण प्रयत्न करायची...पण मी हात धरलेले असेपर्यंतच! मी हात सोडले की लगेच ती पुढचे पाय टेकायचीच. विक्रम वेताळच्या गोष्टीप्रमाणे मी पुन्हा तिला दोन पायांवर चालायला शिकवायला लागायचो.

आमच्या घरी आठवड्यात दोनदा खारी बिस्कीट घेऊन एक माणूस यायचा. केवढी मोठी पेटी असायची त्याच्या डोक्यावर... मी बसलो तरी मावेन इतकी उंच आणि झोपलो तरी मावेन इतकी लांब. त्याच्याकडून आम्ही खारी बिस्कीट घेत असू. त्यातील माझ्या वाट्याची बिस्कीट मी बॉबीला देत असे. बॉबीसुद्धा माझ्या हाताने ती बिस्कीट भरवून घेत असायची.

मात्र काही दिवसातच माझी उंची जरी वाढली नाही, तरी बॉबी उंच होऊ लागली होती. बॉबीला माझ्याबरोबर खेळायला आवडत होत, मात्र आता तिलाही लालीप्रमाणे लांबवर भटकायला आवडू लागले. मी मात्र घराच्या दरवाजात लावलेल्या फळकुटावरून जाऊ शकत नव्हतो. त्यामुळे पूर्वी घराजवळ असणारी बॉबी लांब जाऊ लागल्यावर मी कंटाळू लागलो. कस कोण जाणे मला बाहेर पडायची एक कल्पना सुचली. मी घरातला एक छोटासा डबा घेतला आणि फळकुटावरून बाहेर फेकून दिला... आणि आईला सांगितले,'आई, आपला डबा बघ ना, बाहेर पडलाय. हे फळकूट काढ. आपण डबा आणूया'. पण छे, माझी युक्ती काही सफल झाली नाही. आईने फळकूट काढण्या ऐवजी, तीच फळकुटावरून घराबाहेर गेली आणि डबा घेऊन आली.

बरेच डबे दिवसामागून दिवस घराबाहेर पडायचे पण बाहेर पडून बॉबीच्या मागे पळायची संधी काही मिळायची नाही ती नाहीच. अखेर मी बॉबीची वाट पाहत घरातच अडकून राहायचो. बॉबी चांगलीच भटकू लागली होती. खारी, बटरची वेळ सोडली तर ती घरापासून लांबच राहू लागली. 

एक दिवस मात्र का कोण जाणे बॉबी घराशेजारी मुटकुळ करून झोपली. थोड्या वेळात अंधार पसरू लागला. घराच्या कौलातून येणारा उजेड कमी होत गेला. आईने दरवाजा लावून घेतला. आम्ही आत असलो तरी बाहेर असलेल्या बॉबीची आठवण येत होतीच. मात्र थोड्या वेळातच मला शांत झोप लागली. दुसऱ्या दिवशी उठलो तोपर्यंत चांगलाच उजेड पसरला होता. माझ्या दूध बिस्किटांची वेळ झाली, तरी बॉबी घरातून काही दरवाजाशी दिसली नाही. त्यामुळे आज मला बिस्किटाचा पूर्ण कोटा एकट्यालाच मिळाला.

दूध खारी बटरचा फन्ना उडवून मी दरवाजातील फळकुटापाशी गेलो. आणि पाहतो तर काय बॉबीशेजारी इवली इवली चारपाच पिल्लं दिसत होती. आज तिला खारी बिस्किटांची आठवण नव्हती. ती त्या पिल्लांना चाटण्यातच मग्न होती. थोड्या वेळाने आईने ते दरवाजातील फळकूट काढले. मी हळूच बॉबीजवळ गेलो. तिला बिस्किटांच्या डब्यातुन काढलेले बटर दिले. ती शांतच होती. इवली इवली पिल्लं छान दिसत होती. लाल रंगाच्या लालीच्या पोटी जन्माला आलेली बॉबी पांढरीशुभ्र होती, पण तिच्या पिल्लांमध्ये मात्र एकही पिल्लू पूर्ण लाल किंवा पांढरीशुभ्र नव्हतं. मात्र त्यातील एक काळं पिल्लू मला आवडलं. काही दिवसातच ती पिल्लं चालू लागली. त्या काळ्या पिल्लाचे देखणं रूप पाहून मी त्याला राजा म्हणू लागलो होतो. मी आणि राजाची आता गट्टी जमू लागली. मी आणि राजा खेळत होतो. बॉबी मध्ये मध्ये येऊ लागली. मी बॉबीला म्हटलं,'बॉबी गप्प बस बघू.......माझ्या आणि राजाच्या मध्ये नको येऊ '

Comments

Popular posts from this blog

गाज

मागोवा