दिनांक भाद्रपद ७, १९४२ (२९ ऑगस्ट २०२०)
आपण रडतो आणि आपली आई हसत असते तो एकमेव दिवस म्हणजे आपला जन्मदिवस.
जसे दोन ठिकाणांतील प्रवासात लावलेले अंतर दाखवणारे फलक आपला किती प्रवास झाला हे सांगत असतात. त्याचप्रमाणे, आपला वाढदिवस आपल्या जीवनप्रवासातील किती टप्पा पार केला हे सांगतात. दोन ठिकाणांतील प्रवास किमी मध्ये मोजता येतो तसेच मैलांमध्येही मोजता येतो. त्याचप्रमाणे काळाचा प्रवास चांद्र वर्ष किंवा सौर वर्षांमध्ये मोजता येतो.
सौर कालगणनेनुसार म्हणजे राष्ट्रीय कॅलेंडरनुसार आज माझा ५० वा वाढदिवस! या अर्धशतकी प्रवासात अनेक सुहृदांचे आशीर्वाद, शुभेच्छा पाठीशी होत्या/ आहेत आणि पुढेही राहतील. यानिमित्ताने काही आठवणींना उजाळा...
आई किंवा पप्पा ह्यांच्या आठवणींपेक्षाही आधीपासून जर कोणा व्यक्तीच्या आठवणी मला असतील तर त्या माझ्या आजीच्या!
डोंबिवलीचे ग्रामदैवत असलेल्या श्रीगणेशमंदिरात ती मला घेऊन जात असे. तिथे जाताना वाटेत रस्त्यावरून आजीबरोबर चालत असतानाच्या आठवणी ह्या माझ्या पहिल्या आठवणी. तिच्याबरोबर मिरजेला राहिल्याच्याही आठवणी आहेत. जिथे आजी तिथे मी हे ठरलेलेच! एक दिवस मात्र ती दिसली नाही. मला सांगितले गेले की तिच्या पायाला उंदीर चावला, म्हणून तिला मुंबईला दवाखान्यात ठेवले आहे. नंतर कळले तिच्या पायाचा अंगठा कापावा लागला. आणि काही दिवसात कळले की ती आता कधीच दिसणार नाही.... जीवनातील जगण्याच्या आनंदाचा पहिला अनुभव जिने दिला तिनेच मृत्यूचा पहिला दाखला मला दिला. मी केवळ साडेतीन वर्षांचा असल्याने मला तिचे दर्शनही घेऊ दिले नाही. मी मात्र वर्षानुवर्षे स्वतःशी म्हणायचो, लोकांचा गैरसमज झाला आहे.. ती कधीतरी अचानक नक्की येईल. ती नसली तरी तिची नऊवारी साडी अंगावर पांघरुनच मी झोपायचो. मी कोणाला बोलत नसलो तरी जवळपास १०-१२ वर्ष झाली तरी ती परत येणार ह्यावर माझा विश्वास होता. एके रात्री ती स्वप्नात आली आणि मला म्हणाली ,'अरे शशांक, उठ मी आलेय.' मी तिला स्वप्नातच उत्तर दिले, 'तू कशी येशील, तू तर गेली आहेस.' दुसऱ्या दिवसापासून मात्र माझे मन शांत झाले..तिचे जाणे मान्य व्हावे म्हणूनच कदाचित ती स्वप्नात आली असावी.
माझ्या आई आणि पप्पानी त्यांच्या आर्थिक, मानसिक ओढाताणीची जाणीवही कधी होऊ दिली नाही. माझ्या प्रत्येक वाढदिवसाला होणारी सत्यनारायण पूजा मला सुखावून जायची त्याप्रमाणे त्यांनाही कदाचित माझ्यापेक्षाही जास्त सुखावून जात होती. पगाराच्या दिवशी माझ्यासाठी म्हैसूरपाक आणण्याची आठवण पप्पानी मी स्वतः नोकरीला लागल्यावरही ठेवली. माझी गणित, खेळ आणि सिनेमातील आवड ही माझ्या वडलांचीच देणगी. एकवेळ अभ्यासात मी मागे पडलो तरी ते कधी बोलले नाहीत. मात्र अगदी प्राथमिक शाळेत असताना माझ्या लंगडीच्या स्पर्धेसाठीसुद्धा ते हजर राहिले. तेव्हाही माझ्या पळतीबद्दल ते नुसते भरभरून बोललेच नाहीत तर त्यांनी मार्गदर्शनही केले. मी खेळामध्ये मागे राहू नये ह्यासाठी ते कायम दक्ष असायचे.
पदवी मिळवल्यावरही मी आर्थिक भार उचलावा ही अपेक्षा त्यांनी धरली नाहीच तर मी टेस्ट मॅचचे पाच दिवसांचे तिकीट काढून त्यातले दोन- तीन दिवस आम्ही आळीपाळीने मॅच बघायला जातोय ह्याबद्दलच त्यांना कौतुक होते.
अर्थातच कठीण काळात आईने त्यांना जी साथ दिली त्यामुळे त्यांचे आणि आम्हा भावंडांचे आयुष्यही सावरले गेले.
आई आणि पपा नोकरीनिमित्त दिवसभर बाहेर असायचे तेव्हा मी स्वतःला माझा धाकटा भाऊ राहुल ह्याचा पालकच समजत असे. त्याच्यासाठीही त्याच्या दादाचे वाक्य म्हणजे ब्रह्मवाक्य होते. प्रसंगी तो आईलाही सांगत असे, 'दादाने सांगितलंय....'
माझा मामा... त्याच्या डोळ्यातील प्रेम पाहण्यासाठी माझेही डोळे आतुरलेले असायचे.
आम्ही एकंदर ११ मामे- मावसभावंड! मात्र त्यातील आम्हा ६ जणांचा सहवास जास्त.
माझी मामेबहिण ज्योती आणि मी खरेतर जुळी भावंडच! ठेच मला लागली तरी तिच्या डोळ्यातून पाणी यायचे/ येते. माझ्या मागे उभे राहताना तिने मी योग्य होतो की चूक ह्याचा कधीच विचार केला नाही.
माझ्या पहिल्या वाढदिवसासाठी माझा मामा पुण्याहून आदल्या दिवशी डोंबिवलीला आला, आणि त्याच दिवशी ज्योतीने इहलोकात प्रवेश केल्याची वर्दी दिली.
तर मोठी मामेबहिण उज्वला म्हणजे आमची पालक, मार्गदर्शक! माझा मावसभाऊ हर्षु ह्याचे नाते म्हणजे 'तुझे माझे जमेना, तुझ्याशिवाय करमेना'. आमच्यात जर भांडण झाले तर मात्र आमच्यापेक्षा इतर भावंड, मावशी, आई, आज्जी ह्यांनाच आमच्यापेक्षा त्रास व्हायचा. आमचा समेट झाल्यावर तर ह्या दोघांची भांडण नक्की झाली तरी होती का हा प्रश्न कोणालाही पडावा.
तर आमच्या टीममधील सहावा सभासद म्हणजे माझी मावसबहिण शैलू... हिचा आणि माझा व्यवहार मात्र एकदम स्पष्ट. एकमेकांबरोबर खेळायचे, भांडायचे आणि ज्याची चूक असेल त्याने मान्य करून लगेच पुढे जायचे.
माझ्या आत्याचा शब्द हा मला अंतिम सत्य असे. घरात राहणारी ताई पाहिजे म्हणून हट्ट केला तेव्हा तो हट्ट पूर्ण करायला घरी रहायला आलेली आत्येबहिण वंदना हीने ताईपणाचा भावही खाऊन घेतला. तो ती अजूनही जपते आणि तो तिने कायम जपावा ही माझीही इच्छा आहेच. उमा आणि दीपा ह्या आत्येबहिणींमुळे लहानपण खूपच सुखात गेले.
उमा तर १० वी ला बोर्डात आलेली. मी १२ वी मध्ये असताना टिळकनगर कॉलेजमधील शिक्षक केवळ पाट्या टाकत असत. तेव्हा मराठी व्याकरणासाठी परिक्षेआधी एक दिवस उमाकडे गेलो. तेव्हा तिने अक्षरशः १० मिनिटात शिकवलेल्या व्याकरणामुळे मराठी व्याकरणाची भीती कायमची पळाली. अजितदादा वयाने बराच मोठा. तोही प्रचंड हुशार, पण त्याची ओळख लक्षात राहिली ती त्याच्या संगीतातील प्राविण्यामुळे.
माझे काका हुबळीला असले तरी लहानपणी आमचे येणे जाणे फारच कमी असल्याने माझी चुलतबहिण कीर्ती आणि चुलत भाऊ कुलदीप ह्यांची खरी ओळख महाविद्यालयात असताना/ किंबहुना नंतरच झाली.
माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींमध्ये माझी पहिली मैत्रीण म्हणजे उमा (राणे) आणि पहिला मित्र महेश (राणे). (हे दोघे एकमेकांचे फक्त आडनाव बंधुभगिनी). मध्यंतरीच्या काळात आम्ही एकमेकांना भेटू शकत नव्हतो. मात्र समाजमाध्यमांमुळे ह्यांची माझ्याशी मैत्री अजूनही टिकून आहेच.
संजय कोचर.. ह्याच्याबद्दल लिहायचे तर एक पुस्तकच लिहावे लागेल. आम्ही दोघंही पहिलीपासून एकत्र! ह्याची माझी मैत्री झाली आमचा कॉमन मित्र धनंजयमुळे. प्राथमिक शाळेनंतर धनंजय पुण्याला गेला. तेव्हापासून म्हणजे पाचवी ते १२ वी पर्यंत मी आणि संजय एकाच बेंचवर. राहायलाही शेजारी. संजयबद्दल सांगायचे तर दोस्ताना चित्रपटातील गाणे आठवते... 'बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा.... पता कोई पुछे तो कहते है हम, के एक दुजे के दिलमे रहते है हम...'
त्याचा भाऊ अजय, विजय हे माझे भाऊच, तर माझा भाऊ राहुल हा संजयचाही भाऊच.
संजयप्रमाणेच माझा दुसरा मित्र विनायक करंदीकर.. हाही लहानपणीचा मित्र. आम्ही जास्त जवळ आलो ते मात्र कॉलेजमध्ये. तेव्हा नवीन मैत्रीण झाली की तिचे नाव मला लक्षात राहायचे नाही, पण माझ्या ह्या नवीन मैत्रिणीचे नाव वेळेवर आठवून देण्याची जबाबदारीही विनायक पार पाडायचा. अर्थात त्याची मैत्री एवढ्यापुरती सीमित नव्हती. संजयप्रमाणेच ह्याचाही दोस्ताना हा 'एक दुजेके दिलमे रहते है हम' असाच.
कॉलेजमध्ये असताना विनायक, प्रवीण, गीता, अपर्णा आणि मी असा पाच जणांचा ग्रुप जो जमला तोही आजही घट्ट टिकून आहे.
विजय- संजय आयरे भावंड, योगेश - प्रदीप नेरकर ही भावंड ह्यांची साथही अर्ध्या चड्डीपासून आजतागायत टिकून आहेच.
शाळेतील आणखी एक मित्र म्हणजे राजेश सोमण. ह्याची माझी शाळेतील मैत्री इतक्या विश्वासाची होती की त्याची बहीण आहे एवढेच कारण मला मीराला पत्नी म्हणून स्वीकारायला पुरेसे होते. तिने मला दिलेली साथ हा तर सगळ्यात महत्वाचा ठेवा! माझ्याबरोबर राहता यावे यासाठी सायकलिंग सुरू करणारी माझी पत्नी मीरा ही सुद्धा आता पट्टीची सायकलपटू झाली आहे.
प्रत्येकालाच आपले मूल हा आपला अभिमान असतो. राजस हासुद्धा माझा अभिमान. गणित, खेळ ह्याबद्दलची ह्याची आवडही माझ्या वडिलांप्रमाणेच.
मी कॉलेजमध्ये असताना व्हाट्सअप्प, फेसबुक सारखी समाजमाध्यम तर दूरच पण मोबाईलचाही जन्म झाला नव्हता. इतकच नव्हे तर लँडलाइनही क्वचितच कोणाकडे असायचा.
तेव्हा माझा एक मित्र चंद्रशेखर जोशी वारणानगरला केमिकल इंजिनीरिंग शिकायला गेला होता. (मीही एक दिवस त्याच्या होस्टेलवर गपचूप राहून आलो आहे). तेव्हा मला पत्रमैत्रीचा छंद लागला होता. शेखर ज्या दिवशी डोंबिवलीहून परत वारणानगरला पोचायचा त्याच्या दुसऱ्या दिवशी माझे पत्र त्याला पोचायचे. (मी पत्र GPO मध्ये जाऊन टाकत असे). ते मिळेपर्यंत तो अस्वस्थ असायचा. चंद्रशेखरचा रूम पार्टनर मार्टिनला आमच्या पत्रमैत्रीचा हेवा वाटत असे. त्याला कोणाचेच पत्र येत नसे. हे समजल्यावर मी त्यालाही पत्र लिहू लागलो. आणि मार्टिनही मग मला पत्र लिहायला लागला. ह्यावरून त्यांच्यात वादही झाला होता. ह्या दोघांप्रमाणेच माझी चुलतबहिण किर्ती आणि माझी पत्रमैत्रीसुद्धा घट्ट होती. तिच्या लग्नानंतर ती उदास झाली की सुधाकर (तिचा नवरा) तिला मला पत्र लिहायला सांगत असे.
असाच एक या एक पत्रमित्र म्हणजे तेव्हा इराणमध्ये स्थायिक झालेला माझा शालेय मित्र मुकुंद मोघे. तेव्हा मी फाउंटन/ फोर्ट परिसरात कामाला होतो आणि ५ वाजता ऑफिस संपल्यानंतर बी रोडवर संध्याकाळी ६.३० ला युनिव्हर्सिटी मध्ये एक कोर्स करत होतो. ह्या मधल्या वेळात मी मरिन ड्राईव्हला बसून रोज एक पत्र लिहीत असे, ती मजा स्वर्गीय सुखापेक्षा कमी नसायची.
ठाणे जनता सहकारी बँकेत नोकरी मिळाल्यावर माझा नवीन जगात प्रवेश झाला. घराबाहेरचे घर म्हणजे आमची वागळे इस्टेट शाखा. कोनाकोणाचे नाव घेऊ, तब्बल ३४-३५ जणांचे ते कुटुंब होते. मध्य रेल्वेच्या प्रवासामुळे वागळे शाखेतील किशोर कुवळेकर, प्रमोद देशपांडे, प्रवीण गोरे हे जास्त जवळचे झाले. गोरे- वैद्य ही नावे तर जोडीनेच घेतली जात. अरविंद जोशी, मनोज कुडव, हेबळी ही लोन डिपार्टमेंट ची मंडळी, कुमावत, किशोर जुवेकर हे आमचे आदर्श! दरवर्षी पावसाळ्यात किशोरच्या घरी शहापूरला वागळे शाखेची टीम एक दिवस राहायला जात असे. पटवर्धनसाहेब, फाटकसाहेब, पाठकसाहेब, नवरेसाहेब, पंडितसाहेब ह्यांचे मार्गदर्शन, पाठबळ ह्यामुळेच बँकेत प्रगती करणे शक्य झाले.
मात्र वागळे शाखेतील मित्र मंडळींप्रमाणेच श्रीनगर शाखेत असताना चितळे मॅडम, माधुरी देशपांडे, सीमा फणसे, हर्षद, पाठारे हे सुदधा कुटुंबाचाच भाग झाले. कॉलेजमध्ये हॉस्टेल लाइफची मजा घेता आली नाही, ती मजा चिंचवड येथे एका फ्लॅटमध्ये सात जण एकत्र राहताना पुरेपूर अनुभवली. पुढे ठाणे पूर्व शाखेत दीपक, विजय पटेल, कल्पना टाकळकर, रवींद्र सुंकले, पूजा, वैशाली, डायना आणि इतर सहकारी ह्यांच्यामुळे घराबाहेर घराची ऊब मिळत राहिली.
वास्तविक बँकेतील सर्वच सहकाऱ्यांच्या आठवणी मोलाच्या आहेत. गडकरी मॅडम, करंदीकर मॅडम, पूजा यलत्तिकर, रुणाली, जिनू, रचना ह्यांच्याबरोबर काम करतानाचा आनंद हा वागळे शाखेत काम करतानाच्या आनंदाइतकाच आहे.
लहानपणी माझे आणि हर्षुचे भांडण झाले की मला समजवण्याचे काम करणारी माझी मावशी हिनेच सायकलवण्याचेही वेड मला लावले. १२ वर्षांपूर्वी मधुमेहाचे निदान झाल्यावर माझ्या मावशीच्या सल्ल्यानुसार मी सायकलिंग सुरू केले. तेव्हा मी चिंचवडला होतो. डोंबिवलीला परत आल्यावर मात्र सायकलिंग अनियमित होऊ लागले. त्याच दरम्यान आम्ही ९ जणांनी डोंबिवली सायकल क्लबची (DCC) स्थापना केली. DCC चा वटवृक्ष फोफावत असताना मी रोज ६० किमीचे सायकल2वर्क सुरू केले. DCC हेही एक कुटुंबच बनले. त्यातील सगळ्या सदस्यांबद्दल सांगायचे तर ग्रंथच होईल.
केवळ प्रतिनिधीक स्वरूपात उल्लेख करायचा तर अडुरकाका हे माझे आदर्श! त्याबरोबर अय्यरकाका, पुणतांबेकर, गंधार, वैशाल, सुमित, नयना आघारकार, जयश्री पंडित, घटवाल, पुष्कर (हा तर कॉलेजपासूनचा मित्र), सौमित्र, रुधिर, मेघेश ह्यांची नाव घेण अपरिहार्य आहे. (केवळ विस्तारभयाने इतरांचे उल्लेख राहिले आहेत).
तब्बेतीच्या कारणासाठी सुरु केलेले सायकलिंग व्यसन कधी झाले हे कळलेच नाही. त्या व्यसनामुळे एव्हाना उभा भारत चक्राक्रांत केला आहेच. DCC व्यतिरीक्त ही सायकलवण्याच्या छंदामुळे इतके मित्र जोडले गेले की त्यांचा उल्लेख करण्यासाठीही एक ग्रंथ होईल. पणजी येथील रोहन नगरकर, सावंतवाडीचे कशाळीकर कुटुंब पासून अप्पा, प्रशांत, आशिष, सुनील (गाडगीळ- पाटील- ननावरे), जुगल राठी, विनायक- जितेंद्र-विलास (वैद्य), पासून थेट पंजाब मधील हरजितसिंग, जम्मू येथील हरप्याससिंग ह्यांच्यापर्यंत कोणाचाही दरवाजा रात्री अपरात्री ठोठावला तरी मनापासून स्वागत होईल. खरे तर सायकलवण्याच्या छंदामुळे उभा भारतच नव्हे तर थेट इंग्लंडपर्यंत मित्र जोडले गेले. (तसे म्हटले तर मूळ भारतीय असलेले कांचन- राजेश्वर हे जोडपे तर कॅनडात आहेत, त्यामुळे कॅनडा पर्यंत मित्र जोडले गेले असे म्हटले तरी चालेल).
ठाणे जनता सहकारी बँक म्हणजे आत्ताची TJSB बँकेने जसे जीवनाचे नवे दालन खुले केले, नवे मित्र जोडले गेले. त्याचप्रमाणे सायकलवण्याच्या छंदामुळेही नवे दालन उघडले गेले. किंबहुना बाह्य जगाप्रमाणेच बँकेतही नवी ओळख मिळाली. पत्नीसोबत डोंबिवली पणजी सायकलप्रवास करत असताना सातारा, कराड, कोल्हापूूूर, म्हापसा, पणजी या शाखामध्ये जे स्वागत झाले तेव्हा घरातील माणसांनी कौतुक केल्याचाच आनंद होत होता.
सुवर्णमहोत्सवी वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करायचा ठरवले होते.. ते म्हणजे TJSB बँकेच्या ५० शाखांना जोडणारा सायकलप्रवास पूर्ण करत हा वाढदिवस साजरा करून TJSB बँक आणि सायकल ह्या माझ्या दोन्ही बहुमूल्य गोष्टींची सांगड घालण्याचा विचार होता. सध्याच्या काळात ते शक्य नसले तरी ह्या परिस्थितीतही बँकेच्या सहकाऱ्यांनी दाखवलेल्या ऐक्याच्या बळावर सुरू झालेल्या बसमध्ये वाढदिवस साजरा करत असताना मिळणारे समाधान नक्कीच अविस्मरणीय आहे.
Comments
Post a Comment