आदर्श शिक्षक
'बंड्या शाळेत जातो मग मी का नाही? मला पण शाळेत जायचंय'. माझ्याहून वर्ष सहा महिन्यांनी लहान असलेला बंड्या शाळेत जायला लागल्यापासून मी आईमागे भुणभुण सुरू केली होती. अखेरीस हो ना करता करता माझाही शाळेत प्रवेश झाला. कागदेबाईंची 'जिजामाता मंदिर' शाळा मला पहिल्याच दिवशी आवडली. इतकी मुलंमुली एकत्र रोज भेटणार.. वा, शाळा हे छानच प्रकरण आहे.
मॉंटेसरीच्या वर्गाला सुपेकर बाई शिकवत होत्या. अतिशय शांत स्वभावाच्या सुपेकरबाई मुलांच्या आवाजात कशा टिकून राहत ह्याचे आता मला आश्चर्यच वाटते. मात्र मला त्यांच्या वर्गात फार दिवस बसावे लागले नाही. शाळा मॉंटेसरीपर्यंतच मर्यादित असली तरी कागदेबाईंना ती वाढवायची होती. पुढील वर्गांना परवानगी मिळेल असे गृहीत धरून त्यांनी पहिलीचा वर्ग सुरू केला. वर्गात १९ मुलेमुलीच होती. पण कागदेबाईंना कळले कमीत कमी २० विद्यार्थी असतील तरच पहिलीच्या वर्गाला परवानगी मिळेल. मॉंटेसरीच्या वर्गात कुठे स्थिरस्थावर होतोय न होतोय तोच शाळेला परवानगी मिळावी म्हणून अस्मादिकांना पहिलीच्या वर्गात बसवले गेले. बिचारा बंड्या... तो मॉंटेसरीतच राहिला.
पहिलीच्या वर्गाला मराठेबाई होत्या. माझ्या मामाचे आडनाव मराठे... मी मराठेबाईंना मामीच म्हणायला लागलो. शिक्षक ही संज्ञा कळेइतपत शाळेत जायच्या आतच मी पहिलीत गेलो होतो. शिक्षक म्हणजे काय सोडा, अजून शाळा म्हणजे काय हेच मला कळलं नव्हतं. रोज नीटनेटकं होऊन मामीला भेटायला जायचं ह्याचाच आनंद असायचा. मराठे बाई सुद्धा खुप प्रेमळ होत्या. त्यांनीही माझे नाते लगेच स्वीकारले. पहिलीच्या वर्गातली पहिली चाचणी परीक्षा झाली. माझी पहिली मैत्रीण उमा राणेला सर्व विषयात भोपळे मिळाले होते. तिच्या आईला काही पटेना, पेपर पूर्ण रिकामा होता. परीक्षा देऊन आलो तेव्हाच मी आईला सांगितले होते मी काहिच लिहिले नाही कारण प्रश्नच चुकीचे होते.('घोड्याला किती शिंगे असतात?' हा प्रश्न मला अजून आठवतो). चुकीच्या प्रश्नांची काय उत्तरे द्यायची. भोपळे असलेले पेपर माझ्या आईने स्वीकारले, त्याबरोबर मराठे बाई आणि उमाच्या आईचे दडपण मात्र उतरले. मराठे बाईंची माझ्यावरील माया मात्र अधिकच वाढली. बऱ्याचदा सगळ्यात शेवटी मी शाळेतून जायचो. आईला उशीर झाला तर मीच बाईंना समजावयचो, 'माझा भाऊ लहान आहे ना. त्याला घेऊन येताना आईला उशीर झाला असेल.' मामी भाच्याचे हे नाते फक्त वर्षभरापूरते म्हणजे पहिलीपुरते मर्यादित राहीले नाही. तर माझा मुलगा पहिलीत गेला तेव्हाही हे नाते टिकून राहिले होते. दरम्यान बाई रेवदांड्याला राहायला गेल्या. तरी आमच्या नात्यातील ओलावा टिकून राहिला होता. गेली काही वर्षे मात्र आम्ही संपर्कात नव्हतो (दुर्दैवाने आता संपर्क होणे शक्य नाही).
शाळेला पहिलीची परवानगी मिळावी म्हणून वर चढवलेल्या मी भोपळ्यापासून सुरुवात केली, पण मराठेबाईंनी वार्षिक परीक्षेपर्यंत मला वर्गात आठव्या क्रमांकावर आणून सोडले. शाळेच्या गरजेपोटी मी पहिलीत गेलो, पण माझ्या शाळेला काही परवानगी मिळाली नव्हती. मात्र आम्हा सर्व विद्यार्थ्यांना रेल चाईल्ड संस्थेने सामावून घेतले. पहिलीची परिक्षासुद्धा रेल चाईल्डनेच घेतली होती.
दुसरी व तिसरीला असलेल्या हळबे बाई सुद्धा आम्हाला प्रेमाने समजावत. त्यांचे नातेही अजून टिकून आहे. रस्त्याने जाताना त्या दिसल्या तरी आजही आदराने मान खाली जाते. मात्र चौथीच्या वर्गात असताना शाळेची 'खरी ओळख' झाली. आमचा वर्ग रेल्वे लाइनला लगत होता. तो एकच वर्ग वेगळ्या इमारतीमध्ये होता. त्याच वर्षी मुंबई पुणे दरम्यान धावणारी सिंहगड एक्सप्रेस ही डबलडेकर गाडी सुरू झाली होती. शाळेत घड्याळ बहुधा नव्हते, पण कसं कोण जाणे गाडी येण्याची वेळ मला कळायची. त्याबरोबर धावत मी खिडकीपाशी जात असे. बरं, एखादी गम्मत पहायची असेल तर एकट्याने पहावी असा अप्पलपोटेपणा कशाला करायचा? म्हणून मी मित्र, मैत्रिणींनाही घेऊन जायचो. चौथीला शिकवणाऱ्या काळ्या काळे बाईंना काही ते पटायचं नाही.( हो, शाळेत दोन काळे बाई होत्या. त्यातल्या एक गोऱ्या होत्या आणि एक काळ्या). त्यांनी मला निरनिराळ्या शिक्षा करून पाहिल्या, मुख्याध्यापिकेसमोर उभे केले, पालकांना बोलावून आणायला लावले. . पण पहिले पाढे पंचावन्न.. सिंहगड आणि माझे नाते रोज अधिकच घट्ट होत होते. चौथीचे वर्ष संपले आणि माझ्याबरोबर काळे बाईंनीही निश्वास सोडला.
आता माध्यमिक शाळेत प्रवेश झाला. प्रत्येक विषयाला वेगवेगळे शिक्षक! गंमतच आहे. अमिताभ बच्चन तेव्हा यशोशिखरावर होता. आम्हाला इंग्रजी शिकवणारे रणालकर सर एकदम उमद्या स्वभावाचे होते. आम्ही त्यांना अमिताभच म्हणत असू. योगायोग असा की शुटिंगदरम्यान ठोसा खाऊन अमिताभ मरणाच्या दारात पोचला आणि त्याच दरम्यान रणालकर सर दोन ट्रकच्या मध्ये अडकून अपघातात सापडले. नशिबाने दोघंही... सर आणि अमिताभ संकटातून वाचले. पुढे राजकीय कारणामुळे सरांना शाळा सोडावी लागली. मात्र एके वर्षी वर्षभर शाळेला इंग्रजी आणि विज्ञान ह्या विषयांसाठी शिक्षक नेमता आले नाहीत तेव्हा स्वतःहून सरांनी शाळेत येऊन आम्हाला काही दिवसात क्रॅश कोर्स घेत इंग्रजी शिकवले.
आमचे मुख्याध्यापक श्री भानुशाली सर खरतर वेगळ्या आणि चुकीच्या कारणांसाठी जास्त प्रसिद्ध झाले. मात्र त्यांची शिकवण्याची हातोटी निःसंशय वाखाणण्यासारखी होती. दुर्दैवाने ते वर्षभरात दोन चार तासिका सोडून शिकवायलाच आले नाहीत. संपूर्ण वर्षभर आमचे आम्हीच भौतिकशास्त्र शिकलो(?).
आचार्य सर...हा माणूस हाडाचा शिक्षक होता. त्यांचा विषय होता इतिहास. लोकांना अन्न मिळत नाही म्हणून ते तक्रार करायला फ्रान्सच्या राणीकडे गेल्यावर, त्या राणीने,'पाव मिळत नाही? मग केक खा' असे सांगितले. हा प्रसंग सांगत असताना त्या राणीच्या वक्तव्याची चीड येऊन सरांचा चेहरा असा काही क्रुद्ध झाला होता की ती राणी जर समोर असती तर लगेच तलवार काढून सरांनी तिचा शिरच्छेदच केला असता. पण ती राणी समोर नसून समोर आम्ही होतो आणि सरांकडे तलवारच काय साधा खडूसुद्धा नव्हता. त्यांना कधी खडूची गरजही नसायची. कारण शिकवताना सर आमच्यासमोरच प्रत्यक्ष इतिहास घडवत असत. इतिहासातील पात्र इतिहासात राहतच नसत प्रत्यक्ष वर्तमानात आमच्या समोर जिवंत झालेली असत.
अश्याच दोन उत्तम शिक्षिका आम्हाला लाभल्या होत्या भुस्कुटे बाई आणि इंगळे बाई! भुस्कुटे बाई जीवशास्त्र शिकवायच्या. तर इंगळेबाई भूगोल. शाळेत असताना मला भूगोलाची फार गोडी लागली नाही. इतिहास त्या भूगोलाला तारून नेत असे, कारण इतिहासातील गेलेला गुण मला लढाई हरल्याप्रमाणे वाटायचा.
खरेच अशी लढाई मी ९ वी च्या चाचणी परीक्षेत हरलो होतो. परीक्षा सुरू झाली तेव्हाच मला निसर्गाची हाक आली होती, पण नुकताच पेपर सुरू झाला असल्याने आणि लाजेखातर मी तसाच पेपर लिहायला सुरुवात केली. मात्र मिनिटच नव्हे तर सेकंदागणीक प्रेशर वाढू लागले. मी हिशोब केला इ भु ना (इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र) मिळून ४० मार्कांचा पेपर. त्यात पास व्ह्यायला १४ मार्क हवेत. अक्षरशः १०-१५ मिनिटात इतिहासाचा १४ मार्कांचा पेपर सोडवून पेपर पर्यवेक्षकांकडे दिला. (पर्यवेक्षक सुद्धा नेमक्या भूगोल शिकवणाऱ्या इंगळे बाईच होत्या.). पेपर देऊन थेट धावतच शाळेच्याच नैसर्गिक क्रियाकेंद्रात गेलो. तेथून बाहेर आल्यावर विचार केला चला किमान ४० पैकी १४ मार्क मिळून पास तर होऊ. परीक्षेचा निकाल हातात पडला.... इतिहासातील १ मार्क मी गमावला होता. इतिहासात १४ पैकी १३ आणि एकूण इ भु ना मध्येही ४० पैकी १३ च. लढाई एका मार्काने हरलो होतो. (पुढे १० वी च्या बोर्डाच्या परीक्षेत हिंदी संस्कृत, तर FY BCom ला maths- Stats मध्ये ही दोन पैकी एकच विषय सोडवूनही मी लढाया जिंकल्या)
असो, आचार्य सरांमुळे इतिहासाची गोडी मात्र आणखीच वाढली. इतकी की पूर्वी शिवाजीमहाराज सोडता इतर काही इतिहासात असते हे माहीत नसलेल्या मला, भारताचा स्वातंत्रसंग्राम, दुसरे महायुद्ध, हिटलर हे सगळे जिवाभावाचे विषय झाले.
महात्मा गांधी विद्यामंदिरातील इतरही अनेक शिक्षक आम्हाला शिकवण्याचा आटोकाट प्रयत्न करत. आम्हाला संस्कृत शिकवण्यासाठी इंगळे बाई स्वतः आधी संस्कृत शिकल्या आणि आम्हाला शिकवू लागल्या. आम्हाला दहावीच्या वर्षात संपूर्ण वर्षभर विज्ञान शिकवायला शिक्षक नव्हते. हे समजताच जसे रणालकर सरांनी स्वतःहून इंग्रजीचा क्रॅश कोर्स घेतला, तसेच भुस्कुटे बाईंनीही स्वतःहून जिवशास्त्राचा क्रॅश कोर्स घेतला.
आमची दहावीची नौका पैलतीरी लागली तेव्हा सर्वसाधारण विद्यार्थ्यांएवढे गुण मिळाले असले, तरी माझ्या दुर्दैवाने डोंबिवलीमधील एकमेव कॉलेजमधील एका मुलीने युनिव्हर्सिटी मध्ये झेंडा फडकवल्यामुळे मला प्रथमदर्शनी विनादेणगी प्रवेश उपलब्ध नव्हता. परिणामी टिळकनगर कनिष्ठ महाविद्यालयाची पायरी चढावी लागली. अकरावी मध्ये असताना शाळेचे मुख्याध्यापक होते पुरोहित सर. ते आम्हाला शिकवायला नव्हते. मात्र रोज नजरेस पडत. त्यांची शांत, सात्विक मूर्ती पहिली की वाटे शिक्षक असावा तर असा. अर्थात त्यांच्याकडून शिकण्याची संधी मात्र मिळाली नाही.
बाकी आम्हाला शिकवणारे शिक्षक सर्वसामान्य मात्र मनापासून शिकवणारे होते. अर्थात आम्हीसुद्धा सर्वसामान्यच होतो.
बारावीत गेलो तेव्हा पुरोहित सर मात्र निवृत्त झाले आणि आमचे कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे ११ वी व १२ वी चे वर्ग शाळेपासून दूर गावाबाहेर नवीन जागेत हलवले गेले. वर्ग काय आमचे नशीबच बदलले. आता असा एक प्राणी मुख्याध्यापक झाला होता जो भारतात झालेल्या एशियाड मध्ये कब्बडीचा समालोचक होता, ज्याला आदर्श शिक्षक म्हणून गौरवले गेले होते. आदर्श कशाबद्दल हे मात्र आम्हाला लगेचच कळू लागले. रोज कमीत कमी एका विद्यार्थ्याला शिक्षा केल्याशिवाय ह्या प्राण्याचा दिवस सुरू होत नसे. बरं त्यासाठी त्या विद्यार्थ्यांची चुक असण्याचीही गरज नसे.
खेळाबद्दलचे ह्याचे प्रेम इतके की, आम्ही आंतरजिल्हा खो खो स्पर्धेत संघ उतरवण्याचे ठरवले तेव्हा खळखळ करत का होईना ह्याने परवानगी दिली. मात्र अट अशी की सराव शाळेच्या पटांगणात शाळा सुरू होण्यापूर्वी म्हणजे पहाटे ५.३० ते ६.३० दरम्यान करायचा. त्यानंतर अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेल्या कॉलेजच्या इमारतीमध्ये वेळेवर म्हणजे सातच्या आत पोचायचे. सराव करूनही जर एखादं मिनिटं उशीर झाला तर हातावर पट्टी ठरलेलीच...तीही १२ वी तील विद्यार्थ्याला! पटांगणात खोखोसाठी दोन बाजूला खांब हवे म्हणून आम्ही सांगितल्यावर ताबडतोब लावून दिले खरे. मात्र शाळेतील शिपायाने सरांना सांगितले की खोखो खेळताना आम्ही खांबाला हात लावतो, त्याबरोबर हुकूम निघाला की खांबाला हात लावायचा नाही. आता खोखो खेळताना खांब मारणे, खांबाभोवती पळती ह्याचा सराव काय वर्गात बाकावर बसून करणार? केवळ चांगले हिंदी बोलता येते म्हणून एशियाड मध्ये समालोचक म्हणून काम केलेल्या 'आदर्श शिक्षकाचे' हे खेळाविषयीचे ज्ञान! त्याचा परिणाम म्हणजे स्पर्धेत आम्ही सरावाअभावी पहिल्याच फेरीत बाद झालो.
ह्या प्राण्याचा माथेफिरुपणा एवढ्यावरच सीमित नाही. एकदा कॉलेजमध्ये बँकिंग विषयक माहिती देण्यासाठी विशेष व्याख्यान आयोजित केले होते. मी लहानपणी आईबरोबर कॅनरा बँकेत जात असे. तिथले शिस्तबद्ध काम बघून मला बँकिंगबद्दल फारच आकर्षण वाटत होते. सहावी सातवीत असतानाच मी बँक कर्मचारी व्हायचे ठरवले होते. त्यामुळे हे व्याख्यान मी डोळ्यांची पापणीही न हलवता ऐकले असे म्हटले तरी चालेल. व्याख्यान संपल्यावर मात्र ह्या 'आदर्श' शिक्षकाने मला आणि मागच्या मुलाला उठवले आणि सांगितले की हे दोघे संपूर्ण वेळ गप्पा मारत हसत होते. वास्तविक मी इतके लक्ष देऊन व्याख्यान ऐकले होते की मागचाच काय शेजारच्या मुलाकडेही मी पाहिले नव्हते. तरी आम्हाला दुसऱ्या दिवशी पालकांना घेऊन येण्यास सांगितले. आमचे कोणतेही म्हणणे ऐकून न घेता 'असे परत करणार नाही' असे लिहून घेतले. ही मानसिक खच्चीकरणाची सीमा होती.
ह्या प्राण्यांचा मूर्खपणा एवढ्यावरही थांबला नाही. बारावीची बोर्डाची परीक्षा सुरू होती. दुर्दैवाने केंद्र आमचीच शाळा आली होती. इकॉनॉमिक्सच्या प्रश्नपत्रिका वाटण्यात आल्या. इतक्यात प्रती कमी आल्या होत्या असे लक्षात आले. ह्या प्राण्याने वर्गात येऊन विचारले टिळकनगरमधील विद्यार्थी कोण आहेत. वर्गात आम्ही दोघेजण टिळकनगरचेच विद्यार्थी होतो. आमच्या प्रश्नपत्रिका काढून घेण्यात आल्या. अर्ध्या तासाने प्रती आल्यावर आम्हाला प्रश्नपत्रिका देण्यात आल्या. आमचा जो अर्धा तास गेला तो वाढवूनही दिला गेला नाही. तब्बल २८ मार्कांचा पेपर लिहिताच आला नाही, केवळ त्या प्राण्यामुळे!
ह्या दुराग्रही प्राण्याला 'आदर्श शिक्षक' पुरस्कार मिळण्यामागे त्याची मेहनत होती... विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण करणे, खेळविषयक प्रगती करून न देणे ह्याबद्दलची! अश्या माणसाला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला तेव्हा त्या पुरस्कारालाही लाज वाटत असेल.
सुदैवाने पुढील वर्ष टिळकनगर मध्ये नव्हते. FY B Com साठी पेंढरकर महाविद्यालयात प्रवेश मिळाला. अर्थात शिक्षण घ्यायला आम्ही वर्गात बसतच नसू. मात्र कोचिंग क्लास मध्ये मन लावून अभ्यास केला. सरस्वती कॉमर्स क्लासेस इथे मिळाले खरे शिक्षक. शिरीष देशपांडे मुळे अकौंटसच्या प्रेमात पडलो. मात्र राज सरांनी कमालच केली. शाळेत भूगोल काही आवडीचा विषय नव्हता. पण राज सरांनी कमर्शियल भूगोलाच्या प्रेमात पाडले. तर नायर सरांनी ज्या इकॉनॉमिक्सला भले भले घाबरतात त्या इकॉनॉमिक्सच्याही प्रेमात पाडले. १२ वी मध्ये 'आदर्श शिक्षक' पुरस्कार मिळवलेल्या प्राण्यामुळे इकॉनॉमिक्सचा पेपर पूर्ण लिहिता आला नव्हता, मात्र नायर सरांमुळे B Com च्या अंतिम वर्षी इकॉनॉमिक्स विषयात मी संपूर्ण युनिव्हर्सिटी मध्ये दुसरा आलो होतो.
पुढे बँकेत असताना JAIIB करत असताना एक शिक्षक मला लाभला. मी रजिस्ट्रेशन केल्यावर अवघ्या ४० दिवसात ३ पेपर द्यायचे होते. अभ्यासाला वेळ अजिबातच नव्हता. तेव्हा हा शिक्षक मदतीला धावून आला. त्याने सांगितल्याप्रमाणे आणि सांगितला तेवढाच अभ्यास केला आणि तिन्ही विषयात फक्त पासच नाही झालो तर उत्तम मार्क मिळवून पास झालो. हा शिक्षक म्हणजे माझा कॉलेजमधील आणि तेव्हा TJSB बँकेतही असणारा माझा मित्र शेखर जोशी.
ह्या सगळ्यात माझा आदर्श शिक्षक कोण? मराठेबाई, हळबे बाई, आचार्य सर, शिरीष सर, राज सर, नायर सर की शेखर जोशी? अहो, हे सगळेच आदर्श शिक्षक आहेत... पण माझ्यासाठी आणखी एक शिक्षक सर्वोत्तम आहे...
ज्याने शिकवण्याचा अविर्भावही न आणता मला लहानपणीच गणिताची गोडी लावली, खेळांची गोडी लावली... खेळांसाठी सतत पाठिंबा दिला, इतकेच नव्हे तर माझ्या आयुष्यात पुढे घडणाऱ्या घटना त्यांच्या ज्योतिषशास्त्राच्या ज्ञानामुळे अचूक सांगितल्या, मला मार्गदर्शन केले.... हो, माझ्यासाठी सर्वोत्तम शिक्षक आहेत माझे वडील....माझे पप्पा!
Comments
Post a Comment